भंडारा पत्रिका/वार्ताहर दिघोरी मोठी : ग्रामविकासाच्या नावाखाली खर्च होणाºया शासकीय निधीच्या पारदर्शकतेवर मांदेड ग्रामपंचायतीतील सौर दुहेरी पंपाच्या कामामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून अंदाजे २ लाख ५० हजार रुपये खर्चाचे हे काम करण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार नियोजित स्थळीबांधकाम न करता यापूर्वी अस्तित्वात असलेल्या जुन्या दुहेरी पंपाच्या जागेवरच काम उरकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जुन्या बांधकामातील सांगाडा व पाईप कायम ठेवून पूर्वीची ५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी काढून केवळ २ हजार लिटर क्षमतेची प्लास्टिक टाकी बसविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जुन्या संरचनेचा वापर करून नेमके किती नवीन काम करण्यात आले आणि त्यासाठी प्रत्यक्षात किती खर्च झाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अंदाजे अडीच लाख रुपयांच्या मंजूर खर्चाच्या तुलनेत प्रत्यक्ष काम अत्यल्प झाल्याचा संशय व्यक्त होत असून, कामाचे संपूर्ण बिल उचलण्यात आले आहे की देयक अद्याप प्रलंबित आहे, याबाबतही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेसह आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. मंजूर अंदाजपत्रक, ग्रामपंचायत ठराव, तांत्रिकमान्यता, मोजमाप पुस्तिका, साहित्य खरेदीची बिले आणि प्रत्यक्ष देयकांची पडताळणी केल्यास या कामातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून अरुण बावणकर (पंचायत समिती विस्तार अधिकारी, आरोग्य विभाग) तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून वंदना बोरकर कार्यरत आहेत.
