भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : गेल्या कित्येक दशकांपासून सोनी येथील ग्रामवासीयांच्या वतीने नवविवाहित जोडपे पहिल्या दिवाळीसाठी सासूरवाडीला आल्यानंतर त्यांचा सन्मान केला जातो. नवीन जावयांसह मुलीचे आदरतिथ्य करणे केवळ प्रथा नाही तर गावातील युवकांनी पूर्वजाकडून मिळालेल्या संस्कारांचेही दर्शन घडवून येते, असे मत साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केले. सन १९८० च्या दशकापासून सोनी ग्राम पंचायतचे सरपंच स्व. बळीराम बापू नखाते यांच्या संकल्पनेतून जावई व गावातील युवकांमध्ये कबड्डीचा सामना व त्यानंतर शाल, श्रीफळ व टोपी देऊन सन्मान करण्याची परंपराआजही येथील युवकांच्या माध्यमातून चालू आहे. यंदाही भाऊबीजेच्या पूर्व संध्येला सोनी ग्रामवासियांच्या वतीने ११ नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून भंडारा-गोंदिया विधानपरिषदेचे आमदार अविनाश ब्राम्हणकर हे तर सहउद्घाटक म्हणून साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले तर अध्यक्षस्थानी म्हणून भाजपा अनु. जाती मोर्चा अध्यक्ष दिनेश वासनीक तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद डॉ. प्रतिक उईके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड.वसंतराव एंचीलवार, जि. दुग्धसंघ अध्यक्ष विलास शेंडे, माजी तालुकाध्यक्ष उत्तम भागडकर, से. नि. आर. एफ. ओ,मा. महादेव माकडे, सरपंच कुंता शहारे, रमेश ठेंगडी से. नि. मुख्याध्यापक, प्रा. लोमेश देशमुख, तुषार एंचीलवार,देवीदास सातव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी १६ नवविवाहित मुली व जावयांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक देवीदास गावतूरे यांनी केले. संचालन भूषण चित्रिव यांनी, तर आभार प्रदर्शन भागवत पचारे यांनी मानले.
