भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि शिक्षकांना गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी भंडारा जिल्ह्यातील ३५ शिक्षकांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, या निवड प्रक्रियेवरून आता जिल्ह्यातील शिक्षक वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेले, राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तसेच विविध प्रशिक्षणांमध्ये मार्गदर्शक म्हणून काम केलेले शिक्षक निवडीतून वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्याऐवजी अवघ्या दोन ते तीन वर्षांचा अनुभव असलेल्या शिक्षण सेवकांना संधी दिल्याने निवडीच्या निकषांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, तसेच शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात वाढ व्हावी, यासाठी आयडॉल शिक्षकांची संकल्पना राबविण्यात येते. या उपक्रमांतर्गत अध्यापनात नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे, विषयाचे सखोल ज्ञान असणारे आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया शिक्षकांची निवड अपेक्षित असते. निवड झालेल्या शिक्षकांना राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षण, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी दिली जाते. त्यांच्या अनुभवाचा लाभ इतर शिक्षकांना मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यातील निवड यादी पाहता प्रत्यक्षात कोणत्या निकषांच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यात आली, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. निवड प्रक्रियेत अध्यापनाचा अनुभव, शैक्षणिक गुणवत्ता, नवोपक्रम, प्रशिक्षणाचा अनुभव, पुरस्कार आणिविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार करण्यात आला होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.
