अखेर प्रतीक्षा संपली! भंडारा जिल्ह्याला लवकरच मिळणार ३० नवे केंद्रप्रमुख; १२ वर्षांनंतर नियुक्तीचा मार्ग मोकळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि शैक्षणिक प्रशासनाला बळकटी देण्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. तब्बल १२ वर्षांपासून रिक्त असलेल्या केंद्रप्रमुख पदांचा वनवास आता संपणार असून, जिल्ह्याला लवकरच ३० नवे केंद्रप्रमुख मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या ‘केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’ अंतर्गत या नियुक्ती प्रक्रियेला कमालीचा वेग आला आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेबाबत समाजमाध्यमांवर काही गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, पात्र गुणवंत उमेदवारांनी एकत्र येत वस्तुस्थिती जाहीर केली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि न्यायालयीन चौकटीतच होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन… उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाकडून कोणतीही घाईगडबडीत प्रक्रिया राबवली जात नसून, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील: या भरती प्रक्रियेवर आधी न्यायालयीन स्थगिती होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने २६ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही अंतरीम स्थगिती उठवली. त्यानंतरच शासनाने पुढील प्रशासकीय पावले उचलली आहेत. ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिकेच्या (रछढ) अंतिम निकालाच्या अधीन असणार आहे.

MahaTET/CTET  चा ‘कट-आॅफ’ नियम: मुंबई उच्च न्यायालयाने उमेदवारांना महाटेट (टंँंळएळ) किंवा सीटीईटी (उळएळ) पात्रता प्राप्त करण्यासाठी ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली होती. या निश्चित तारखेनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांचा समावेश करणे नियमबाह्य ठरेल. त्यामुळे न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच प्रक्रिया पुढे जात आहे.

तालुकानिहाय अशी होणार पदभरती… भंडारा जिल्ह्यातील ३० रिक्त जागांवर तालुकानिहाय खालीलप्रमाणे केंद्रप्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे यामध्ये तुमसर५, भंडारा- ५, लाखनी- ४, साकोली- ४, मोहाडी- ४, पवनी- ४, लाखांदूर- ४ अश्या प्रकारे जागा भरल्या जाणार असल्याची माहिती आहे.

४ जूनच्या निर्देशानंतर हालचालींना वेग… शालेय शिक्षण विभागाने ४ जून २०२६ रोजी जिल्हानिहाय निवड यादी तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सध्या कागदपत्र पडताळणी व इतर प्रशासकीय प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच अंतिम नियुक्ती आदेश निर्गमित केले जातील.

शैक्षणिक गुणवत्तेला मिळणार चालना… केंद्रस्तरावरील शैक्षणिक व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी केंद्रप्रमुख हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गेली अनेक वर्षे ही पदे रिक्त असल्याने शाळांच्या पर्यवेक्षणावर आणि शैक्षणिक प्रशासनावर विपरीत परिणाम होत होता. आता या ३० नव्या केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीमुळे भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि शालेय प्रशासनाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *