
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहराच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून नगरपरिषदेत सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहेत. नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे यांनी नगरपरिषदेतील विविध गैरप्रकारांवर थेट कारवाईचा बडगा उगारल्यानंतर हितसंबंधी गटांमध्ये अस्वस्थता वाढली असून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे.
नगरपरिषदेच्या मालमत्तांवरील अनधिकृत बांधकामे, लाखो रुपयांचे थकीत भाडे आणि नियमबाह्य व्यवहारांवर नगराध्यक्षांनी कठोर भूमिका घेतली आहे. पत्र क्रमांक ३४/२०२६ अंतर्गत पराग मानापुरे तसेच ३८/२०२६ अन्वये एका विद्यमान नगरसेवकाच्याह्यबालपांडे ट्रेडर्सह्ण या आस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे. गाळा क्रमांक ४ सह इतर मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर भाडे थकवणा?्यांविरोधात जप्ती आणि फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय जलयोजनांमधील अनियमितता, सार्वजनिक जागांचा गैरवापर आणि विनापरवानगी उभारण्यात आलेल्या व्यावसायिक बांधकामांची चौकशीही वेगाने सुरू आहे. अनेक प्रकरणांमध्ये संबंधितांवर कारवाईची टांगती तलवार असल्याने काही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अतिक्रमण आणि नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये चार ते पाच नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी अविश्वास ठरावाचा मुद्दा पुढे आणला जात असल्याची चर्चा आहे. नगराध्यक्षांच्या आक्रमक आणि पारदर्शक कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून भ्रष्टाचाराविरोधातील भूमिकेला वाढता जनसमर्थन मिळताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात अविश्वास ठरावाचा निर्णय आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडी निर्णायक ठरणार आहेत.