विधान परिषद निवडणूक : बहुमत असूनही महायुतीसमोर मतविभाजनाचे आव्हान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीस अवघे चार दिवस शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. १८ जून रोजी होणाºया या निवडणुकीत महायुतीकडे विजयासाठी आवश्यक बहुमताचा ‘मॅजिक फिगर’ असला तरी अंतर्गत मतविभाजनाची भीती डोके वर काढत आहे. विशेषत: अर्थकारण आणि ‘टोकन’ वाटपावरून मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. महायुतीकडून अविनाश ब्राम्हणकर हे उमेदवार रिंगणात असून त्यांच्या प्रचाराची धुरा आमदार परिणय फुके आणि दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीचे प्रमुख नेते सांभाळत आहेत.

दुसरीकडे, काँग्रेसने अधिकृत उमेदवार मागे घेत अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा दिला आहे. ईश्वरकर यांच्या प्रचाराची जबाबदारी आमदार नाना पटोले यांनी स्वीकारली असून त्यांच्यासोबत खासदार डॉ. प्रशांत पडोळे व माजी आमदार दिलीप बन्सोडही सक्रिय आहेत. सध्या दोन्ही बाजूंकडून मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. महायुतीचे उमेदवार ब्राम्हणकर गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत असून वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रणनीती आखत आहेत. तर ईश्वरकर यांच्या टीमकडूनही दोन्ही जिल्ह्यांत मतदार संपर्क मोहिमेला वेग आला आहे. या मतदारसंघात एकूण ४५७ मतदार असून प्रत्येक मत निर्णायक मानले जात आहे. मंगळवारपासून दोन्ही गटांकडून मतदारांना ‘टूर’वर पाठवण्याची तयारी सुरू असून मतदानाच्या दिवशी त्यांना थेट मतदानासाठी आणण्याचे नियोजनअसल्याची माहिती आहे.

या निवडणुकीत अर्थकारण महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची चर्चा असून महायुतीकडून मतदारांना ‘टोकन’ वाटप करण्यात येत आहे. मात्र, हे वाटप समान प्रमाणात झाले नसल्याने काही मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बाब लक्षात घेता नागपूरमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अलीकडेच बैठक घेतली. या बैठकीत ‘एकही मत फुटता कामा नये’ असा कडक इशारा देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काही ठिकाणी भविष्यातील राजकीय संधींचा उल्लेख करून मतदारांवर दबाव टाकल्याच्याही चर्चा आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *