चवदार अन् आरोग्यदायी… जांभळांची बाजारात ‘एन्ट्री’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच बाजारपेठेत हंगामी फळांची लगबग वाढली आहे. यामध्ये सध्या जांभळांनी बाजारात जोरदार ‘एन्ट्री’ केली असून शहरातील विविध भागांमध्ये त्यांची विक्री सुरू झाली आहे. रस्त्यांच्या कडेला, चौकांमध्ये तसेच मिस्कील टँक चौक परिसरात जांभूळ विक्रेत्यांची रेलचेल दिसून येत आहे. सध्या जांभळांना २०० ते ४०० रुपये प्रति किलो असा दर मिळत असूनही ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काळसरजांभळ्या रंगाचे, आंबट-गोड चवीचे हे फळ केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त मानले जाते.

आरोग्यासाठी गुणकारी जांभूळ

जांभळामध्ये विविध पोषक घटक आढळतात. तज्ज्ञांच्या मते, हे फळ पचनसंस्थेपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक बाबींमध्ये फायदेशीर ठरते.

पचनशक्ती सुधारते : जांभळातील तंतूमय पदार्थ (फायबर) पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांमध्ये जांभूळ उपयुक्त ठरते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते : व्हिटॅमिन सी, अँटीआॅक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध असलेले जांभूळ शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

वजन नियंत्रणासाठी सहाय्यक : कमी कॅलरी आणि अधिक फायबरमुळे जांभूळ खाल्ल्यानंतर पोट भरल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ उपयुक्त मानले जाते.

रक्त शुद्धीकरणास मदत : जांभळातील नैसर्गिक गुणधर्म रक्त शुद्ध ठेवण्यास सहाय्य करतात. त्वचेच्या आरोग्यासाठीही ते लाभदायक ठरते.

मधुमेह व हृदयासाठी लाभदायक

जांभळामध्ये आढळणारे ‘जॅम्बोलिन’ आणि ‘जॅम्बोसीन’ हे घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ विशेष फायदेशीर मानले जाते. याशिवाय, जांभळातील पोटॅशियम आणि अँटीआॅक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास हातभार लागतो.

मर्यादित प्रमाणात सेवनाचा सल्ला

जरी जांभूळ आरोग्यदायी असले तरी त्याचे अतिसेवन टाळावे, असा सल्ला डॉक्टर देतात. विशेषत: रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात जांभूळ खाल्ल्यास काहींना पचनासंबंधी तक्रारी उद्भवू शकतात.

दरम्यान, शहरात जांभळांची आवक दिवसेंदिवस वाढत असून आगामी काही दिवसांत त्यांचे दर स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना चवदार आणि पौष्टिक जांभळांचा आस्वाद घेण्याची संधी मिळत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *