अंत्यविधीवरून परतताना दुचाकीची धडक; वृद्ध महिला गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : भाचे सुनेच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने स्वगावी परतत असताना भरधाव दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ६५ वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली, तर तिची मुलगी व जावई किरकोळ जखमी झाले. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास लाखांदूर पंचायत समिती कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर घडली. सरस्वता लिनाजी गडे वय (६५)राह . लाखांदूर असे गंभीर जखमी महिलेचे नाव असून विजय गोपीनाथ शेंडे वय (४०) व नर्मदा विजय शेंडे वय (३५) दोघेही राहणार चप्राड अशी किरकोळ जखमी मुलगी व जावयाची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वता गडे यांच्या भाचे सुनेचे निधन झाल्याने त्या मुलगी व जावयासोबत दुचाकीने भागडी येथे अंत्यविधीसाठी गेल्या होत्या. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तिघेही दुचाकीने स्वगावी परतत होते. दरम्यान, लाखांदूर पंचायत समिती कार्यालयासमोर पोहोचले असता वळण घेत असलेल्या अन्य एका दुचाकीस्वाराने भरधाव वेगात येत असताना त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेमुळे दुचाकीवरील तिघेही राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रस्त्यावर कोसळले. यात सरस्वता गडे यांना गंभीर दुखापत झाली, तर मुलगी व जावई किरकोळ जखमी झाले.

अपघातानंतर धडक देणारा दुचाकीस्वार आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मार्गावरील नागरिकांनी तत्काळ मदत करीत जखमींना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, सरस्वता गडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *