पाथरी शिवारातील कारवाई
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : गोबरवाही पोलीस ठाण्यांतर्गत पाथरी शिवारात सुरू असलेल्या अवैध दारूबट्टीवर पोलिसांनी धडक कारवाई करीत १ लाख ८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अवैध दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा मोहफुलाचा सडवा, हातभट्टीची दारू आणि दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी गौरव भीमराव नांदगाये (वय ४५, रा. पाथरी, ता. तुमसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धर्मगाये यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाथरी शिवारातील शेत परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपीच्या ताब्यात अवैध दारू निर्मितीचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळ्यावरून ३०० किलो मोहफुलाचा सडवा, १०० लिटर हातभट्टीची दारू, मोठी जर्मन कची व तांब्याचे झाकण, चार टिनचे पिपे, १२० किलो मोहफुलाचा सडवा, दोन प्लास्टिक पाईप तसेच पाच मण जळाऊ लाकडे असा एकूण १ लाख ८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात अप.क्र. ५२८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ), (ब), (क), (ड), (ई) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बैरागी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक धर्मगाये व गोबरवाही पोलीस पथकाने केली.
