बदलत्या मोसमाचा कापूस पिकाला धोका

बोंडधारणा झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील गर्रा-बघेडा परिसरात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली आहे. सध्या कापूस पिकाला बोंडे लागण्यास सुरुवात झाली असून, काही ठिकाणी बोंडांची चांगली वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, बदलत्या मोसमामुळे कापूस पिकावर संकटाचे सावट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून, कधी ढगाळ वातावरण तर कधी तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. अशा अनिश्चित हवामानाचा परिणाम कापूस पिकावर होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील आर्द्रता आणि हवामानातील अचानक बदल यामुळे बोंडांची गुणवत्ता, वाढ तसेच उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

कापूस पीक सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याने शेतकरी पिकाची विशेष काळजी घेत आहेत. वर्षभर केलेला खर्च, मेहनत आणि घेतलेले कर्ज यांची परतफेड कापसाच्या उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा आर्थिक संकट ओढवू नये, अशी चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य मार्गदर्शन करावे तसेच कापूस पिकावरील संभाव्य रोग व किडींच्या प्रादुर्भावाबाबत वेळोवेळी सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *