भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी:- बारव्हा येथे अनेक वर्षांपासून पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बालूभाऊ चुन्ने यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, मंगळवारी बारव्हा येथे पोलीस चौकीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मोरे यांच्या हस्ते पोलीस चौकीचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी परिसरातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बारव्हा येथे पोलीस चौकी सुरू झाल्याने परिसरातील गावांमधील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना तातडीने पोलीस मदत मिळण्यासह महिला सुरक्षा, चोरीच्या घटना तसेच विविध वादविवादांवर वेळीच नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी बालूभाऊ चुन्ने यांनी बारव्हा येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र व वाचनालय सुरू करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक मोरे यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांना सदर उपक्रम लवकर सुरूकरण्याबाबत सूचना दिल्या.बारव्हा परिसरातील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने बालूभाऊ चुन्ने यांनी पोलीस प्रशासन, सहकार्य करणारे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिकांचे आभार मानले.उद्घाटनप्रसंगी सरपंच रणजीत नैताम, उपसरपंच अनिल कापगते, रविंद्र मेश्राम, ग्रामसेवक चौबे, तलाठी बिसेन, पोलीस पाटील सलामे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.बारव्हा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची स्थापना हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, यामुळे ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
