संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम दिनांक १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ५ सप्टेंबर रोजी जिल्हा समन्वय कार्यशाळा सभा जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील उपस्थित होते. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले. समाजात क्षयरोगा विषयी जनजागृती करुन क्षयरोगाचे निदाना अभावी अद्यापही वंचित असणाºया क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणण्याचा प्रयत्न करावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. या मोहिमेकरीता दोन सदस्यांचे एक पथक राहणार आहे. या पथकामध्ये आशा सेविका व पुरुष स्वयंसेवक असणार आहे. हे पथक कुटूंबातील व्यक्तींची तपासणी करणार असून रोगाची लक्षणे आहेत किंवा नाही याबाबत तपासणी करणार आहेत. त्यामुळे घरी येणाºया पथकाला तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे व सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.रोशन राऊत यांनी केले आहे. जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असणार आहे.

यासाठी शहरी व ग्रामीण भागासाठी विविध पथक व मोबाईल पथक कार्यान्वित केले जाणार असून पर्यवेक्षणासाठी गाव निहाय आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आशा गटप्रवर्तक, सामुदायिक आरोग्य अधिकारी यांची निवड केली जाणार आहे. सदर मोहिमेत शहरी भागात १,३४,३८० व ग्रामीण भागात १२,५९,७३४ लोकसंख्या सर्वेक्षित केली जाणार असून शहरी भागातील २६,८७६ व ग्रामीण भागातील २,५१,९४६ घरांना १०७६ प्रशिक्षित पथकाद्वारे तपासणी करणार असल्याचे डॉ.रोशन राऊत यांनी सांगितले. मोहिमे दरम्यान संशयित क्षयरोग संबंधाने लक्षणे असलेल्या लोकांचे थुंकी नमूने तपासून शासकीय वाहनातून एक्सरे काढण्यासाठी संदर्भीत केले जाणार असून तात्काळ औषधोपचार सुरु करणार असल्याचे डॉ.नितीन कापसे यांनी सांगितले. जिल्हा समन्वयक कार्यशाळा सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.रोशन राऊत, केटीएस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद खंडाते, बाई गंगाबाई नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती जी.जी.येलम, आरोग्य विभागाचे जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात, क्षयरोग विभागाचे वैद्यकीय पर्यवेक्षक एन.डब्ल्यू.चकोले व इतर कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *