लंपी रोगाच्या प्रतिकारासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्याच्या काही भागात पशुधनावर लंपी रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. मात्र सध्या भंडारा जिल्हयात लंपीचा प्रादुर्भाव नसून पशुसंवर्धन विभागाने लंपीच्या प्रतिकारासाठी नियंत्रण कक्षासह लसीच्या उपलब्धतेपर्यत तयारी करून ठेवली असल्याची माहिती उपायुक्त डॉ.वाय .एस.वंजारी यांनी आज दिली. लंपी आजाराच्या पाश्र्वभुमीवर खबरदारी म्हणून जिल्हयात बैलगाडा शर्यती, प्राणी प्रदर्शने, बाजार ,यात्रा व जनावरांच्या ने आणी करण्यासा पुर्णत बंदीचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी काल निर्गमीत केले आहेत. जिल्हयात प्रत्येक तालुक्यात पशुचिकीत्सालय असून जिल्हा परिषद व राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग पशुपालकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत आहे. पशुगणनेनुसार जिल्हयात सध्या तीन लाखाहून अधिक गायी,म्हशी व अन्य पशुधन आहे.लंपी रोग हा वेक्टरद्वारे (उदा. डास, माशी, गोचिड ) इत्यादीमुळे पसरतो. आजपर्यंत कोणत्याही विशिष्ट वेक्टरची आळख पटली गेली नसली तरी डास, चावणाठया माश्या आणि गोचिड हे रोगप्रसारास मुख्यत: कारणीभूत आहेत. मात्र गोचीड चावल्यामुळे होणारे पुरळ किंवा फोड हा तुलनेने लहान असतो व तो एक दोन दिवसात निघून जातो.मात्र लंपीमध्ये जनावरांच्या अंगावर मोठया गाठी येतात.तसेच त्या वाढून फुटतात व त्याच्या जखमा होतात.अश्या जनावरांला तात्काळ गोठयातील अन्य जनावरांपासून वेगळे केले पाहीजे व पशुवैदयकांकडे उपचारासाठी नेले पाहीजे.

बाधित गुरांचा लैगींक संपर्क आल्यास प्रसार वाढतो. तसेच चावणाठया माशा, डास, गोचीड,चिलटे हे ही प्रसार करतात.त्यासाठी गोठयामध्ये डास, माश्या होणार नाही यांची दक्षता घ्यावी. साथीचा आजार सुरू असेपर्यत बाजारातुन जनावरांची खरेदी थांबवावी.जिल्हयातील पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विभागाने बॅनर,पोस्टर व पत्रकांचे वितरण गावागावात सुरू केली आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाने शीघ्रदलाची स्थापना केली असून त्यात अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे.बाधित पशुंचे विलगीकरण, तसेच नमुना चाचणीसाठी विभागीय पातळीवरील नागपूर येथील प्रयोगशाळेत व तेथुन भोपाळ येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लंपीचा विषाणु बाधा झाल्यावर १४ दिवसानंतर लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये सुरूवातीस पशुंना भरपूर ताप, डोळयातुन व नाकातुन चिकट स्त्राव, चारा पाणि खाणे बंद, दुग्ध उत्पादन कमी, तर काही जनावरांत पायावर सुज येवून लंगडणे अशी लक्षणे दिसून येतात,असे ही श्री.वंजारी यांनी सांगितले. सध्या जिल्हयात ३१ हजार ५०० लसी उपलब्ध असुन त्यांचे वितरण तालुका चिकीत्सालयात करण्यात आले आहे.लसीचा शासकीय दर ६ रू. ३० पैसे असुन अधिकच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविण्यात आली आहे. लंपी रोगापासून पशुपालकांनी काळजी म्हणून रोगी जनावरे वेगळी ठेवातीत, पशुवैद्यकांकडे जनावरांची तपासणी करावी, लक्षणानुसार उपचार करावे, जनावरांना तोंडावारे इंजेक्शन द्यावीत. लंपी रोग झाल्यास प्रादुर्भावग्रस्त भागापासून पाच किमीच्या परिसरातील गाय वर्गीय व म्हैसवर्गीय जनावरांना गोटपॉक्स लस १ मिली नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जावून टोचावी. अधिक माहितीसाठी उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालयाच्या ०७१८४-२५२४१३ वर संपर्क साधण्याचे आवाहन श्री.वंजारी यांनी यावेळी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *