विदर्भासाठी विचारपूर्वक सुनियोजनाची गरज!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : विदर्भवाद्यांनी केवळ भावनिक होऊन चालणार नाही तर त्यासाठी विचारपूर्वक सुनियोजित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले. तसेच नागपूर शहर वगळल्यास विदर्भ आणि बिहारमधील जिल्ह्यांची स्थिती सारखीच असल्याचे आकडेवारीवरून दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. वेगळ्या विदर्भाकरिता धोरणनिश्चिती करण्यासाठी प्रशांत किशोर पहिल्यांदाच नागपूर दौºयावर आले आहेत. त्यांनी मंगळवारी सिव्हिल लाईन्सस्थित चिटणवीस सेंटर येथे विदर्भातील आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी माजी आ. आशिष देशमुख, अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, अहमद कादर, नितीन मोहोड, मंगेश तेलंग, नितीन रोंगे, चरण वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत किशोर पुढे म्हणाले, मी विदर्भाला तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कधीच समजू शकणार नाही. मी आणि माझी टीम तुमचा अनुभव ऐकण्यासाठी आलो आहोत. त्या आधारे पुढची रणनीती ठरविली जाईल. मात्र, एवढे नक्की की विदर्भ वेगळा होणार यात दुमत नाही. लोकांमध्ये हा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच राजकीय नव्हे तर जनआंदोलनातूनच वेगळा विदर्भ होईल असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून मी रणनीतीकार म्हणून काम करीत होतो. सहा राज्यात मी सत्तापरिवर्तन बघितले आहे. मात्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यातील निवडणूक जिंकल्यानंतर हे लक्षात आले की, सत्ता बदलाने व्यवस्थेतही बदल होईल याची काही एक शाश्वती नाही, म्हणून मी राजकीय रणनीतीकाराचे काम करणे बंद केले आहे. आता लोकासांठी काम करायचे आहे. त्यामुळे बिहारमध्ये लोकतांत्रिक दलाच्या माध्यमातून काम सुरू असून विदर्भाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतो आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.