फळरोप वाटिका कामगारांचे १५ महिन्याचे प्रलंबित वेतन दिवाळीपूर्वी द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा व आंधळगाव येथील शासकीय फळ रोपवाटिका कामगारांचे १५ महिन्यांचे प्रलंबित वेतन दिवाळीपूर्वी देण्याच्या मागणीचे निवेदन दिनांक ३ आॅक्टोबरला राज्याचे उपमुख्यमंत्री व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना आयटकचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे समन्वयक कॉ हिवराज उके यांनी दिले. तत्पूर्वी आयटक सचिव कॉ.हिवराज उके यांना कामगारांनी दिलेल्या निवेदनात सांगितले की, आम्ही २०-२५ वर्षापासून तथाकथित ठेका पद्धतीने रोजंदारी काम करतो. परंतु आम्हाला अतिशय कमी वेतनात म्हणजे इजीएस पेक्षाही कमी वेतनात काम करावे लागते. आणि वर्ष दीड वर्षापर्यंत मजुरी दिली जात नाही. आणि कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देखील आठ तासाच्या कामाचे मूल्य फळ रोपवाटिका कामगारांना रू.१५० ही मिळत नसेल तर हा फार मोठा अन्याय आहे. आणि म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे नियोजन भवन भंडारा येथे आगमनाप्रसंगी त्यांना फळरोप वाटिका कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन कॉ. हिवराज उके यांच्या हस्ते देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शासन कृषी आयुक्त पुणे यांना ग्रँड देते व ती मंजूर ग्रँड विभागीय कृषी संचालकामार्फत जिल्ह्याला दिली जाते. परंतु मागील २०२० पासून शासना कडून ग्रँट मिळाली नाही म्हणून कामगारांचे पंधरा महिन्याचे वेतन मिळालेले नाहीत. दिवाळीपूर्वी प्रलंबित वेतन मिळाले नाही तर जिल्हा प्रशासना समोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असेही कॉ. हिवराज उके यांनी म्हटले आहे. प्रमुख मागण्यांमध्ये १५ महिन्याचे प्रलंबित वेतन दिवाळीपूर्वी देण्यात यावे. नियमित काम व दर महिन्याला ठराविक वेतन देण्यात यावे. ठेका पद्धती बंद करण्यात यावी व पुर्ववत मस्टर वर काम व वेतन देण्यात यावे. सर्व कामगारांच्या मजुरीत वाढ करण्यात यावे व किमान वेतन लागू करावे. सर्व कामगारांना ओळखपत्र देण्यात यावे इत्यादी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *