गोंदिया ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप ४ तर काँग्रेस १

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीकरिता रविवारी (ता. १६) मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी (ता. १७) मतमोजणी झाली. या मतमोजणीत गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव, गोरेगाव तालुक्यातील निंबा, देवरी तालुक्यातील सुकळी, अजुर्नी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध या चार ग्रामपंचायतीवर भाजप समर्थित पॅनेलने, तर अजुर्नी मोरगाव तालुक्यातील भरनोली ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस समर्थित पॅनेलने विजय मिळविला आहे. मुदत संपलेल्या आणि विभाजन झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार, गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव, गोरेगाव तालुक्यातील निंबा, देवरी तालुक्यातील सुकळी, अजुर्नी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध व भरनोली या पाच ग्रामपंचायतींकरिता रविवारी (ता. १६) मतदान घेण्यात आले. डोंगरगाव ग्रामपंचायतीकरिता ८६.७८ टक्के, निंबा ८४.६१ टक्के, सुकळी ७७.७७ टक्के, सिरेगावबांध व भरनोली ग्रामपंचायतीकरिता ७८.३५ टक्के इतके मतदान झाले. रविवारी मतदान यंत्रात बंद झालेल्या उमेदवारांचे भाग्य आज मतमोजणीच्या रूपाने बाहेर आले. या मतमोजणीत भाजप समर्थित पॅनेलने चार ग्रामपंचायतींवर दणदणीत विजय मिळविला. गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायतीत भाजप समर्थित कोमेश्वरी नरेंद्र टेंभरे सरपंच म्हणून निवडून आल्या.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थित गोंडवाना ग्रामविकास पॅनेलचे सरपंच व सदस्य निवडून आले. सरपंचपदी सुनीता धर्मराज कवडो विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक-१ मधून मन्साराम ताराम, विनोद हलामी, लता देव्हारे, प्रभाग क्रमांक-२ मधून विश्वनाथ राऊत, पूर्णा शहारे, प्रभाग क्रमांक-३ मधून सुकलाल हलामी, सपना कोल्हे, निशा झाडे निवडून आले व कालिंदा होळी या बिनविरोध निवडून आल्या.तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतीत सागरबाई चिमणकर या सरपंच म्हणून निवडून आल्या. गोरेगाव तालुक्यातील निंबा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप समर्थित १ सरपंच, ६ सदस्य असे सात, तर काँग्रेस समर्थित ३ सदस्य निवडून आले. भारतीय जनता पक्ष समर्थित उमेदवार सरपंच म्हणून थेट मतदारातून वर्षा पटले या निवडून आल्या, तर सदस्य म्हणून संजय शहारे, संगिता कुंजाम, मालता भगत, नंदलाल उईके, पुरुषोत्तम कटरे, पुष्पा पटले निवडून आले. देवरी तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतीत भाजप समर्थित कमलेश कल्लो सरपंच म्हणून निवडून आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.