जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आदिवासी बांधवांचा एल्गार मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- आदिवासी विद्यार्थी, महिला, बेरोजगार तरुण, मजूर, शेतमजूर, कर्मचारी, अधिकारी आणि समाजाचा विशाल मोर्चा बुधवार २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास गोंदिया येथील स्व. इंदिरा गांधी स्टेडियम येथून घोषणा देत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दरम्यान आदिवासी बचाव आंदोलनाची घोषणा देत या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी सेवक मालती किन्नाके यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालया समोरील जागेत या मोर्चा सभेत रूपांतर झाले व समाजातील विविध घटकांतील पुढा-यांनी मोरच्याला संबोधित करतांना आदिवासी समाजावर शासन प्रशासनातर्फे होणा-या अत्याचाराची वाचा फोडली.

२८ बुधवारी रोजी निघालेल्या मोर्च्यात आदिवासी बांधवांनी आपल्या विविध मागण्या शासनाकडे केल्या त्यात २३ नोव्हेंबर २०२३ ला मुंबई येथे झालेल्या बैठकीत १३०९ गावे पेसा कायदयातून वगळण्याचा आदिवासी विकास विभागाचा निर्णय रद्द करण्यात यावा, गोंदिया जिल्हयामध्ये ८० टक्के ग्राम सभेची पूर्वसंमती न घेता ग्रामसभांचा विरोध असतांना व्याघ्र प्रकल्प च नियोजित असलेला नवेगाव व सिंधुदुर्ग हत्ती प्रकल्प रद्द करण्यात यावा, आदिवासी विकास विभागामार्फत उपाय योजना आणि शबरी योजना अंतर्गत योजनेत जमानतीचे अट शिथील करण्यात यावी, आदिवासींचे प्राचीन सांस्कृतिक भावनिक स्थान कचारगड ला आंतरराष्ट्रीय तीर्थस्थळ करण्यात यावं व राज्य मार्फत विकासासाठी १००० कोटींची निधी मंजूर करण्यात यावी, गोंदिया जिल्हा स्थावर आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक विकासाकरिता ५००० क्षमतेचे सामूहिक समाज भवन निर्माण करण्यात यावे, आश्रमशाळेत, नामांकित शाळेत व वस्तीगृहात विद्याथीर्नींचे होत असलेले शोषण आणि दमन थांबविण्यासाठी विशेष आदिवासी शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक सुरक्षा कायदा अधिनियम बनवण्यात यावें, आदिवासी विकास विभाग मार्फत निर्धारित निधी फक्त आदिवासी ठेकेदार, बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार युवा नागरिकांच्या मार्फत सर्व बांधकाम व विकास कामे करण्याचा कायदा करण्यात यावा, श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळा कोकणा-जमी ता. सडक अजुर्नी जि. गोंदिया या शाळेतील मुलीसोबत लैंगिक अत्याचारा विषयी संबंधित अधिका-यांवर सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, गैर आदिवासी द्वारे अनुसूचित व इतर क्षेत्रात असंविधानिक रित्या जमिनी बळकावल्या गेल्या आहेत. त्यांना न्याय देवून आदिवासींच्या जमिनी परत करण्यात यावे. बोगसांना दिलेले संरक्षण रद्द करून मूळ आदिवासींचे पद भरती करण्यात यावी.

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात क्रांतीविर नारायणसिंगजी उईक यांचे स्मारक तयार करण्यात यावे, आदिवासी महिलांवर होणा-या लैंगिक अत्याचारावर कायदेचे सक्तीपालन करून प्रलंचित प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्यात यावी. ग्राम तावसी ता. अर्जुनी मोरगाव येथील मारहाण झालेल्या आदिवासी महिला मंगला उईके यांना तत्काळ न्याय देण्यात यावा, नक्षल प्रभावित आदिवासी क्षेत्रात आदिवासीवर जबरन नक्षल समर्थक आणि अर्बन नक्षल म्हणून नागरिकांवर खोटे आरोप करून त्यांच्या लोकतांत्रिक वैध मागणीसाठी होणारे आंदोलन दाबण्याचे षडयंत्र थांबवावे, नागलडोह येथील स्थानिकांचा पुर्नवसन करण्यात यावे या मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या प्रसंगी बिरसा ब्रिगेड गोंदिया, आदिवासी विदयार्थी संघ, गोंदिया, विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी सेवा समिती गोंदिया, आदिवासी एकता समिती गोंदिया ग्रामीण, गोंडवाना गोड महासभा गोंदिया, हलबा हलबी समाज संघटना गोंदिया, कंवर समाज संघटना गोंदिया, नगारची समाज संघटना, गोंदिया, आदिवासी जय गोंडवाना सेवा समिती गोंदिया, जब सेवा आदिवासी सेवा समिती गोंदिया च गोटूल सेवा समिती गोंदिया जिल्हा आदि संगठनांचे कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *