वाळू माफियाचा तहसीलदारावर प्राणघातक हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : वाळू माफिया ने केलेल्या हल्ल्यानंतर मोहाडी तहसीलदार यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहा या गावी घडली . गोळीबार झाल्याची ही घटना जिल्ह्यात हवेसारखी पसरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटना स्थळी जावून पाहणी केली. तहसीलदार यांच्या तक्रारीनंतर पोलीस स्टेशन मोहाडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांना रोहा या गावी साठवलेली वाळू जेसीपी द्वारे टिप्पर मध्ये भरून चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. तहसीलदार कारंडे यांनी त्यांच्या चमूसह रोहा येथे प्रत्यक्षात भेट दिली असता जेसीबीद्वारे टिप्परमध्ये वाळू घालण्याचे काम सुरू होते. तहसीलदार यांनी सदर काम थांबवून आम्हाला शासकीय कार्यवाही करण्यास मदत करावी असे आव्हान जेसीबी चालकाला केले असता जेसीबी चालकाने त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याद्वारे हल्ला चढविला मात्र तहसीलदार यांनी कसाबसा स्वत:चा बचाव केला त्यानंतर जेसीबी चालकाने तिथून जेसीपी घेवून पळ काढला.

तहसीलदार यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा जेसीबी चालकाने पुन्हा त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याने जीवघेणा हल्ला केला. दोनदा झालेल्या जीवघेणा हल्ल्यामुळे तहसीलदार यांनी स्वत:च्या संरक्षणार्थ त्यांच्याकडे असलेली परवानाधारक बंदुकीने हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून जेसीबी तिथेच सोडून पळून गेला. या संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदार यांनी मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीपी आणि टीप्पर ताब्यात घेतले. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्यासह घटनास्थळी जाऊन चौकशी केली. या संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदारांनी मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीबी आणि टीप्पर ताब्यात घेतले. या प्रकरणी तहसीलदार दीपक करंडे यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी जेसीबी चालक, मालक, तसेच टिप्पर चालक आणि मालक यांच्याविरुद्ध कलम ३५३, ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंद केला.

काही वेळातच पोलिसांनी जेसीबी चालक रंजीत ठवकर रा. रोहा याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तर रात्री उशिरा टिप्पर चालक विवेक चामट (२५) रा. कुशारी याला अटक करण्यात आली.या घटनेचा मुख्य सुत्रधार कमलेश बांडेबुचे असल्याची चर्चा गावात व परिसरात आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास इतरही लोकांवर गुन्हा नोंद करून त्यांनाही अटक केली जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतांनी यांनी सांगितले. तर माझ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने स्वत:च्या स्वसंरक्षणाकरिता हवेत गोळीबार करावा लागल्याचे तहसीलदार करंडे यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *