उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे आरोग्याचा धोका बळावला

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा : शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या संख्येत हातठेले तर कायमस्वरुपी दुकानांतून चटकदार खाद्यपदार्थ विकले जातात. परंतु, स्वच्छता जेमतेम असल्याने उघड्यावरील खाद्यपदार्थ आरोग्याला अपायकारक ठरण्याचा धोका बळावला आहे. शहरातील प्रमुख मार्गावरील बरीच दुकाने नाल्यांवर असून आजुबाजूला दुर्गंधी, कचरा पसरला असतो. अन्नपदार्थांवर माशा घोंगावत असतात. अन्नपदार्थ कोणी तयार करताना बघितले तर तोंडात धरणार नाही, अशी अवस्था असते. मात्र, यापासून अनभिज्ञ नागरिक मोठ्या आवडीने या मेन्यूवर ताव मारताना दिसतात. यात बहुतांश दुकाने ही चायनीज खाद्यपदार्थांची असून पावभाजी, पाणीपुरी, दाबेली व इतर दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गावर सतत नागरिकांची गर्दी दिसून येते. खाद्य पदार्थांची विक्री करू नये, यासाठी कठोर कायदा तयार करण्यात आला असला तरी शहरात मात्र सर्वत्र उघड्यावर अन्न पदार्थांची जोरात विक्री केली जात आहे. याठिकाणी वापरात असलेले पाणीही तितकेसे शुद्ध नसते. या पार्श्वभूमीवर उघड्यावर होणारी खाद्य पदार्थांची विक्री नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे, असे असले अन्न व औषध प्रशासनाने याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. खाद्य पदार्थांची विक्री करताना अनेक नियम पाळावे लागतात. ज्या ठिकाणी स्टॉल आहे तेथे सांडपाणी वाहून नेणारी नाली नसावी अथवा एखाद्या गटाराच्या काठावर स्टॉल लावू नये, असा नियम आहे.

मात्र शहरातील अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी या नियमाला बगल दिली आहे. अनेक स्टॉल घाणीच्या जवळपासच असल्याचे दिसते. ज्या दुकानातून खाद्य पदार्थांची विक्री केली जाते, त्या दुकानात स्वच्छता ठेवण्याचा नियम आहे. मात्र शहरातील काही हॉटेल्सना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली असता, काही ठराविक हॉटेलमध्येच ही स्वच्छता पाळली जात असल्याचे दिसून आले. सोबतच हे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेले पाणीही अशुद्ध असते. खाद्य पदार्थावर जाळीसारखे आवरण झाकले पाहिजे, असाही नियम आहे. परंतु बसस्थानक, जिल्हा कचेरी व जिल्हापरीषद परिसर, पोस्ट आॅफिस चौक परीसर, मुस्लीम लायब्ररी चौक परीसर, त्रिमुर्ती चौक परीसर, राजीव गांधी चौक परीसर, शास्त्री चौक परीसर, गांधी चौक परीसर तसेच इतरही मुख्य मार्गावरील अनेक दुकानांमध्ये खाद्य पदार्थ उघड्यावर ठेवले जातात. रस्त्यावरून वाहनांचे आवागमन सुरू राहत असल्याने या पदार्थावर मोठ्या प्रमाणावर धूळ बसते. त्यामुळे हे पदार्थ दूषित होतात. त्यापासून आरोग्याला बाधा पोहचते, असे असतानाही धुळीने माखलेले खाद्य पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. याविरूद्ध अन्न व औषध प्रशासनाने काही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. सध्या शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संसर्गजन्य आजारांची लागण झाली आहे. अशावेळी असे उघड्यावरील पदार्थ खाणे आणि तेथील पाणी पिणे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. पण बाहेरील पदार्थ थोडेफार स्वस्त मिळत असल्याने नागरिक असे पदार्थ खाण्यावर जास्त भर देतात. जिल्हा परीषद, जिल्हा कचेरी आणि बसस्थानक परिसरात हा प्रकार जास्त दिसतो. उघड्यावरील पदार्थ खाल्ल्यामुळे आणि तेथील पाण्यामुळे पोटाचे आणि संसर्गजन्य आजार बळावू लागल्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. चांगला वास आणि चमचमीतपणा यामुळे चायनिजचे पदार्थ खाण्यास अनेकांची पसंती असते. मात्र, हे पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया मंद होते. फूड अ‍ॅन्ड ड्रग्स विभागाची वेगवेगळ्या μलेवरच्या पदार्थांचा वापर करण्यास परवानगी असली तरी त्याचा काही ठिकाणी अति वापर केला जातो. यामुळे अपचण, प्रजनन क्षमता खराब होऊ शकते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *