छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने भाजपा कार्यकर्त्यांचे काम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : भारतीय जनता पार्टीचे १८ कोटी कोट्यवधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजापासून प्रेरणा घेऊन काम करतात व शिवरायाचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले. त्यांनी सांगितले की, भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वयाच्या ७९ व्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून गेले. पदवीदान समारंभात जे वक्तव्य झाले त्याचे कोणी समर्थन करत नाही. परंतु, केवळ एखाद्या विधानावरून त्यांना कोडीत पकडू नये. ते म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत लाजीरवाण्या शब्दात टीका केली त्याची संपूर्ण महाराष्ट्राने निंदा केली. पण आदित्य ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हिदुत्व, शिवाजी महाराज, सावरकर या विषयाची काळजी असते तर अशी गळाभेट घेतली नसती.

खा. संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पडेल असे भाकित केले त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सरकार मजबूत आहे. ते कार्यकाळ पूर्ण करेल. विरोधी पक्षांपैकी वीस ते पंचवीस आमदाराचे या सरकारला छुपे समर्थन आहे. सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितले तर सध्याच्या १६४ पेक्षा खूप जास्त आमदाराचे समर्थन दिसेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात असताना काँग्रेसच्या पाचशे सक्रीय व स्थानिक पातळीवरील प्रभावी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आमच्याबद्दल बोलण्यापेक्षा आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या तीन पक्षाना उमेदवार तरी मिळतात का पहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आल्याच्या वृत्ताविषयी विचारले असता प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, आम्ही अशा धमक्याना भीक घालत नाही. केंद्रात अमित शाह गृहमंत्री आहेत. तर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार सक्षम आहे. धमकी देणाºयांना शोधून कारवाई केली जाईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *