थंडीचा कडाका वाढल्याने शेकोट्यांचा आधार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यासह राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट पाहायला मिळत आहे. यामुळे जिल्ह्याचा पारा घसरला आहे. तापमान ११ अंशावर आले आहे. जिल्ह्यात थंडीची लाटेमुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेतायेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त थंडी अनुभवायला मिळत आहे. विदर्भात थंडीचा कडाका सुरुच असून, मंगळवारीही थंडीची तीव्र लाट कायम राहिली. यवतमाळ, गोंदियासह बहुतांश जिल्ह्यांमध्ये लाटेचा जोरदार प्रभाव दिसून आला. उल्लेखनीय म्हणजे, भंडारा जिल्ह्याचे तापमान ११ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यामुळे सध्या कडाक्याच्या थंडीचा फटका ग्रामीणांसह शहरवासीयांना बसला आहे. यामुळे सर्वत्र शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. थंडीच्या लाटेने अख्ख्या विदर्भाला आपल्या कवेत घेतले आहे. यवतमाळमध्ये लागोपाठ दुसºया दिवशी विदर्भात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. येथे नोंद झालेले १०.० अंश सेल्सिअस तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी होते. महाबळेश्वर येथे १०.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. यवतमाळपाठोपाठ गोंदिया येथे सर्वात कमी १०.५ तापमानाची नोंद करण्यात आले. भंडारा येथे ११ अंशांवर तर नागपूरचा पारा मात्र ११.४ अंशांवर कायम राहिला. बुलडाणा (११.६ अंश सेल्सिअस), अमरावती (११.७ अंश सेल्सिअस), अकोला (१२.० अंश सेल्सिअस) व वर्धा (१२.२ अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्येही थंडीच्या तीव्र लाटेचा प्रभाव जाणवला. कडाक्याच्या थंडीमुळे ग्रामीण भागातीलच नव्हे, शहरवासीही सध्या कमालीचे त्रस्त आहेत. दिवसाही बोचरे वारे वाहात असल्यामुळे स्वेटर्स व जॅकेट्स घालून फिरावे लागत आहे. शिवाय शेकोट्यांचा आधारही घ्यावा लागत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने या आठवड्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचे संकेत दिल्याने सध्यातरी कडाक्यापासून विदर्भासह भंडारा जिल्ह्याची सुटका शक्य नाही.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.