भटके समाजबांधवांसोबत दिवाळी स्नेहमिलन साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेतर्फे दिवाळी स्नेह मिलनभाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन आज २१ नोव्हेंबर रोजी भंडारा येथील मेंढा परिसरात करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचारक अनंत (तात्या) देशपांडे, युवा उद्योजक गौरव गुप्ता, भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष शेखर बोरसे मंचावर उपस्थित होते. भारतमातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भटक्या समाजबांधवांशी स्नेहमिलन सोहळा साजरा करीत मतानी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कामानिमित्त गावोगावी भटकंती करताना अनेक समस्या येतात. मुलांना त्रास होतो, अभ्यासावर परिणाम होतो. मात्र आईवडील अनेक त्रास सहन करून व स्वत:च्या स्वप्नांना विसरून मुलांना शिकविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आईवडील हे मुलांचे खरे शिक्षक आहेत. मुलांनी त्यांचा सन्मान करावा व नेहमी ॠण मानावेत, असे मत लोहीत मतानी यांनी व्यक्त केले. तर अनंत देशपांडे यांनीही संबोधित करताना, बंधुभाव हाच खरा धर्म असून सर्व समाज एक आहे. आपण भारत मातेची लेकर आहोत आणि तिच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे. रोजगारा निमित्त तुम्ही कुठेही असा, पण या भारत मातेची सेवा करा, असे सांगितले. गौरव गुप्ता यांनीही मार्गदर्शन केले.

प्रसंगी उपस्थीत महिलांनी मान्यवरांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. या महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला गेला. तसेच क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारी प्राची संतेकर, वैष्णवी संतेकर या खेळाडूंचा व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंची भेट देण्यात आली. येथील भटके समाज बांधवांसाठी अशाप्रकारचा स्नेहमिलन कार्यक्रम पहिल्यांदाच या वस्तीत आयोजीत करण्यात आला होता. वस्तीतील बैरागी, कहार, लोहार समाजबांधवांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदचे विभागप्रमुख शिवाजी कांबळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय राजेंद्र डोनाडकर यांनी केला. सूत्रसंचालन श्रीकांत तिजारे व आभार प्रदर्शन शरद सोनकुसरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामचंद्र नंदूरकर, चमन शुक्लगोत्र, आतिश पारधी, अविनाश शेंडे, अमन नागरे, अंकीत शुक्लगोत्र, राजेश संतेकर, रमण सूनवये, रुपा नंदूरकर, सुनीता पारधी यांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *