उड्डाणपुलावर बर्निंग ट्रकचा थरार ;चालक वाहक सुरक्षित

वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शहरवासीय भयभीत

लाखनी – स्थानिक शहरातून जाणाऱ्या महामार्गावर बांधलेल्या उड्डाणपुलावरून ट्रक कंटेनर पडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेनंतर शनिवारी एका मालवाहू मिनीडोरला आग लागली. वारंवार घडत असलेल्या घटनेच्या श्रुंखलेत रविवारी रात्री 1.15 वाजेच्या सुमारास याच उड्डाणपुलावरून जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग लागल्याच्या घटनेने शहरवासीय भयभीत झाले आहेत. आगीचा तांडव इतका भीषण होता की ट्रकमध्ये भरलेले लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. उड्डाणपुलाच्या खाली सर्विस रोडवर अतिक्रमण केलेल्या फूटपाथवरील दुकानांवर ठिणग्या पडत होत्या. सुदैवाने चालकाने आपला मालवाहू ट्रक उड्डाणपुलाच्या बाजूला उभा केला आणि वाहकासह खाली उतरल्याने त्यांचा जीव वाचला. शहराच्या मध्यभागी असलेल्या सिंधी लाईन समोर उड्डाण पुलावर ट्रकला अचानक लागलेल्या आगीच्या ज्वाला एवढ्या जोरात होत्या की, उड्डाणपुलाच्या 50 ते 100 फूट खाली चिगांर्‍या उडत होत्या. सिंधी लाईनच्या आजूबाजूला असलेली दुकाने व अतिक्रमण फुटपाथ दुकानांचे बॅनर, त्रिपाल शेड. जळाले आणि नुकसान झाले. शहरातील सर्व्हिस रोडवर आणि उड्डाणपुलाखालील रस्त्यालगत असलेल्या फुटपाथ दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे अशा घटनांचे स्वरूप भविष्यात भीषण स्वरूप धारण करू शकते याची शक्यता नाकारता येत नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या घोटरा ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक चरणजीत सिंग यांचा बारा चाकी ट्रक (CG 04HX 9738) विविध प्रकारचा परचून साहित्याचे बॉक्स भरून गुजरात राज्यातील वापी शहरातून रायपूरला जात होता. चालक रमन कुमार ३८ वर्ष पंजाब सध्या नागपूर रहिवासी क्लिनर अनिल ठाकरे ५४ बालाघाट रा.गुजरात राज्याच्या वापी शहरातून परचून मालाचे बॉक्स पेंटचे डबे, तांब्याच्या तारांचे बंडल रासायनिक साहित्य विविध प्रकारचे साहित्य इत्यादी ट्रकमध्ये भरून रायपूरकडे जात असताना रात्री १.१५ वाजता लाखनी उड्डाणपुलावर ट्रकचे वायरिंग शॉर्ट होऊन आग लागली.आगीचे वाढते स्वरूप पाहून चालक रमनकुमार यांनी ट्रक सिंधी लाईन चौकाजवळील उड्डाणपुलाच्या बाजूला उभा केला आणि क्लिनर अनिल ठाकरे यांच्यासह ट्रकमधून सावधपणे खाली उतरला.

ट्रकमध्ये ठेवलेले पेंटचे डबे स्फोट होऊन ठिणग्यांसह सिंधी लाईन चौकातील आवारात असलेल्या दुकानांवर पडू लागले. आगीची माहिती मिळताच सिंधी लाईन चौक परिसरातील रहिवासी, दुकानदार, पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आगीमुळे उड्डाणपुलावरील प्रथम एकेरी वाहतूक बंद करण्यात आली होती. उंच ज्वाळा व ठिणग्या पडल्याने उड्डाण पुलाच्या एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. उड्डाण पुलाच्या खाली राहुल खेडीकर, अखिल खेडीकर, मोहसीन आकबानी, जावेद लध्दानी, तुषार निंबेकर, नागराज कोठेकर, मयूर निंबेकर व इतर सहकारी तरुणांनी उड्डाणपुलाच्या खाली उडणाऱ्या ठिणग्यांवर पाणी शिंपडून आग विझविली. लाखनी नगर पंचायतीचे अग्निशमन वाहन देखभालीसाठी नागपूरला वर्कशॉप मध्ये गेल्यामुळे भंडारा येथून सुमारे अर्ध्या तासाने अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी पोहोचले.

भंडारा येथून दुपारी दोन वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाचे वाहन आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. .साकोली नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनाला पाचारण करण्यात आले, पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी स्वत: पोलीस वाहनाच्या वर उभे राहून सहकाऱ्यांसह आग विझवली.सकाळी 10 वाजेपर्यंत हे काम सुरू होते.. दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन क्रेनच्या सहाय्याने जळालेला ट्रक उड्डाणपुलावरून खाली काढण्यात आला, ट्रकमध्ये भरलेले संपूर्ण साहित्य जळून राख झाले, होते ते जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. दुपारी १:३० वाजता लागलेल्या ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी व अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस स्टेशनचे मिलिंद तायडे, राष्ट्रीय महामार्ग पोलीस निरीक्षक बघेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक आगाशे सहायक पोलीस निरीक्षक संजय कोरचे पो. ह. आशिष निबांर्ते, मंगेश चाचेरे, रामकृष्ण बावनकुळे, सुनील सरजारे, स्वप्नील कहाळकर तसेच काँग्रेसचे मोहन निर्वाण, दीपक देशमुख, आमीर अकबानी, जीशान अकबानी, व शहरातील तरुणांनी सहकार्य केले. आगीचे वृत्त समजताच शहरात कडाक्याच्या थंडीतही घटनास्थळी महिला-पुरुषांसह नागरिकांची गर्दी झाली होती

उड्डाणपुलावर घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे, उड्डाणपुलाच्या दोन्ही टोकाला असलेल्या सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्याने कंटेनर खाली पडला, आगीच्या भडक्यात धावणाऱ्या वाहनांच्या ठिणग्या, दुकानांवर सव्‍‌र्हिस रोडवर पडत आहेत. उड्डाणपूल उभारणीच्या वेळी व्हील गार्ड न लावल्याने कंटेनर खाली पडला, तसेच सुरक्षा भिंतीला उंच जाळ्या न लावल्याने उड्डाणपुलाखालील परिसर धोक्यात आल्याचे तांत्रिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बांधकाम सुरू झाल्यापासूनच वाहतूक सुरू झाली आहे, अवजड आणि हलकी वाहने उड्डाणपुलावरून जातात, मोठा आवाज येतो, तसेच जॉइंटवर लावलेले केमिकलही पडू लागले आहे, या सर्व त्रुटींमुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाची तांत्रिकदृष्ट्या व्यवस्था करून पुरेशी सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे .अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *