अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान देताच चुलीवरील बाबांचे पितळ उघड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अमरावती : सध्या अंधश्रद्धेचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान देताच अनेकांची धांदल उडाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आलेला आहे. चुलीखाली लाकडे पेटवून त्यावर गरम झालेल्या तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद आणि घाणेरड्या शिव्या देणाºया महाराजाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले. यानंतर महाराजांची आता चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. चुलीवरचा बाबा अशा नव्या नावाने सध्या या बाबाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये चुलीवर बसलेल्या बाबाच्या भोवताली काही लोक जमले असल्याचे दिसत आहे. या बाबाचे असे विचित्र नाटक असणारा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी या बाबाचे नामकरण चुलीवरचा बाबा असे देखील केले.

चुलीवर बसणाºया भोंदू बाबाचा हा प्रकार अमरावतीपासून १७ किलोमीटर अंतरावर असणाºया मार्डी गावात सुरू आहे. हा बाबा स्वत:ला सच्चिदानंद गुरुदास महाराज असे म्हणून घेतो. त्याचे खरे नाव सुनील कावलकर आहे. तो पूर्वीमजुरी काम करायचा. आता पंधरा वर्षांपासून त्याने स्वत:ला बाबा घोषित केले आहे. या बाबांनी आता चक्क चुलीवर बसण्याचा प्रताप केला आहे. पेटलेल्या चुलीवर मोठा तवा ठेवून त्यावर मांडी घालून बसणाºया या बाबाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या गरम तव्यावर तब्बल पाच मिनिटे बसून दाखवण्याचे आव्हान दिले आहे.

या बाबाने हे आव्हान स्वीकारले तर त्याला तीस लाख रुपये देणार अशी घोषणा देखील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. हे आव्हान स्वीकारल्यावर बाबाला चटका बसू नये, जर बाबाला चटका बसून इजा झाली, तर त्यासाठी बाबा जबाबदार राहील असे देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्पष्ट केले आहे.दरम्यान चुलीवर बसणाºया बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबाला आव्हान देताच, या बाबाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कथित बाबा म्हणाले मार्डी परिसरात २४ वर्षांपासून मी समाजसेवेचे काम करतो. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वावर भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते.

यावर्षी भागवत सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी अचानक मी माझो भान हरपले. पेटलेल्या चुलीवरील गरम तव्यावर जाऊन बसलो. या प्रकाराचा व्हिडिओ कोणीतरी काढून व्हायरल केला. माझा स्वत:चा अंधश्रद्धेवर विश्वास नाही, मी संत गाडगेबाबांना मानणारा व्यक्ती आहे. माझे गोसेवेचे काम आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी देखील या बाबाने केली आहे. मी कुठलाही चमत्कार केला नाही, असे स्वत: बाबांनी वायरल केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले असताना त्याच व्हिडिओमध्ये हा चमत्कार देखील आहे, असे वक्तव्य देखील केले आहे. एकूणच व्हायरल व्हिडिओमुळे जगासमोर आलेला हा भोंदू बाबा आता मार्डी गावातून पसार झाला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *