पवनी तालुक्यात बसस्थानकच सापडेना!

भंडारा पत्रिका/वार्ताहर अड्याळ : विदर्भाची काशी तथा विकसित तालुका म्हणून भंडारा जिल्ह्यात नावाजलेला पवनी तालुक्यात एकही बसस्थानक उपलब्ध नसल्यामुळे पवनी तालुक्यातील प्रवाशांना मात्र ऊन, वारा, पावसाचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ – कोंढा शहरात सुसज्ज बसस्थानकाची मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. या क्षेत्राचे आमदार तथा खासदार यांना बसस्थानकाच्या मागणीची जाणीव करून देण्यात आली. आमदार यांची दुसरी इनिंग असताना सुद्धा अड्याळ शहरात बसस्थानकाची मागणी पूर्ण झालेली नाही. आता तरी आमदार साहेब बसस्थानकाच्या मागणीकडे लक्ष देतील काय? असा प्रश्न नागरिक करीत आहे. पवनी तालुक्याचे मुख्य बाजारपेठ असलेल्या अड्याळ हे घोडा यात्रा तसेच हनुमंत नगरी म्हणून ओळख असलेल्या ठिकाणी सुसज्ज बस स्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस झेलत रस्त्यावरूनच बस पकडावी लागते आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागातील पवनी तसेच भंडारा आगारा अंतर्गत हे दोन्हीस्थळे येतात. पवनी नंतर सर्वाधिक वर्दळीचे बसस्थानक म्हणून कोंढा व अड्याळ गणले जाते. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात महसुलही एस. टी. ला प्रवाशाच्या माध्यमातून प्राप्त होतो. मात्र येथे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सर्व सोयींयुक्त बसस्थानकाची निर्मिती आजपर्यंत होऊ शकली नाही. परिणामी रस्त्यावरच तासन्तास उभे राहून प्रवाश-ांना आपली बस पकडावी लागते आहे. अड्याळ येथे बसस्थानक निर्मितीत जागेच्या अडचणीचे मुख्य कारण आहे. अड्याळ येथे जागा शोधण्यात आली. मात्र जागा मालकाशी नियोजन तथा वाटाघाटी योग्यरीत्या होऊ शकली नाही. त्यामुळे येथील बसस्थानक निर्मितीचा प्रश्न थंडबस्त्यात पडला आहे.
कोंढा व अड्याळ हे प्रमुख बाजा-रपेठ व व्यस्त ठिकाण असल्याने या ठिकाणी सुसज्ज बसस्थानक व्हावे. यासाठी मागील काही वर्षापासून नागरिकांची मागणी आहे. मात्र त्यावर आजतागायत वेगवान पावले कधीच उचलण्यात आली नाही. त्यामुळे अत्यंत कासवगतीने जागा शोध कार्य व इतर प्रक्रिया सुरू असताना दिसते. बसस्थानक नसल्याने नागरिकांना रस्त्यावरील हॉटेल व पानटपरीचा आधार घेऊन उभे राहावे लागते. यात लहान मुले, महिला, वयोवृद्ध मंडळी यांची गैरसोय होते. ऊन, वारा, पाऊस असल्यास ही स्थिती अधिकच गंभीर होते. सद्यस्थितीत असलेल्या बसस्थानक स्थळी बसचे वेळापत्रक लावले नाही. त्यामुळे बसेस बाबत निश्चित माहिती प्रवाशांना कळत नाही. अड्याळ येथे बस थांबा स्थळी साधा प्रवाशी निवारा नसून स्वच्छतागृहाची देखभाल होताना दिसत नाही. परिणामी नागरिकांची मोठी तारांबळ उडताना दिसते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *