पेट्रोलपंप मालकाची हत्या करून दोन लाख रुपये लुटले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर (भिवापूर) : भिवापूर येथील पेट्रोलपंपावर हिशोब घेत बसलेल्या मालकावर दुचाकीने आलेल्या तीन बंदूकधारी इसमांनी चाकुने वार करीत करित त्याची हत्या केली. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास १५ ते २० मिनिटे चाललेल्या थरकाप उडविणा-या या घटनेने खळबळ उडाली आहे. दिलीप राजेश्वर सोनटक्के (६०) रा. दिघोरी नागपूर असे मृत पेट्रोलपंप मालकाचे नाव आहे. प्राप्त माहिती दिलीप सोनटक्के यांचा भिवापूर येथील राष्ट्रीय मार्गावर पेट्रोल पंप आहे. नेहमी प्रमाणे दिलीप हे सकाळी १० वाजताच्या सुमारास कारने नागपूर येथून भिवापूरच्या पेट्रोल पंपावर आले. आॅफीस मध्ये बसले असतानाच पाठोपाठ दहा ते पंधरा मिनीटात एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी थेट पेट्रोल पंपच्या आॅफिस मध्ये प्रवेश करीत, धारदार चाकुने दिलीप यांच्यावर वार केले. यावेळी लगतच्याच एका रूम मध्ये दोन कर्मचारी हिशोब करीत होते, तर दोन कर्मचारी बाहेर मशिनवरती काम करीत होते.

दरम्यान आरोपींनी कर्मचा-यांना बंदूकीचा धाक दाखविल्याने कर्मचा-यांनी पळ ठोकला. तर यातील एका कर्मचा-याच्या डोक्याला बंदूकीचा मार लागला. कर्मचारी पळून जाताच, आरोपींनी दिलीप यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवत, पेट्रोल पंपवरील हिशोबाचे अंदाजे २ लाख रुपये घेऊन पळ ठोकला. या घटनेचे सर्व लाईव्ह चित्र पेट्रोलपंपच्या आतील व बाहेरील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. दरम्यान आरोपी पळून जाताच यातील दोन कर्मचाºयांनी पोलीसात धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह शवविच्छेदणाकरीता स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनास्थळावरून चाकु व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हत्येचे कारण काय?

दिलीप सोनटक्के हे भिवापूर लगतच्या कोलारी (जि.चंद्रपूर) या मुळगावचे आहे. प्रॉपर्टी डिलींगच्या व्यवसायातून मागील अनेक वर्षापासून ते नागपूर येथील दिघोरी परिसरात कुटूंबासह वास्तव्यास आहे. ही हत्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी प्रॉपर्टीचा वाद किंवा अनैतिक संबंध सुद्धा या हत्याकांडामागचे कारण असू शकते, अशी चर्चा आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.