जलजीवन नळ योजनेत गैरव्यवहार?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : सध्या तालुक्यातील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनांच्या कामांच्या तक्रारी थांबण्याचे नाव घेत नाहीत. येथे वापरण्यात येणाºया साहित्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत, मात्र संबंधित अभियंत्या बरोबरच जिल्हा परिषद प्रशासनही याकडे दुर्लक्ष करण्यात गुंतले असल्याने शासनाच्या लाखो रुपयाच्या गैरव्यवहार होत आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये हिच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे हर घर जल मिशन अंतर्गत प्रत्येक गावात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून अनेक सरपंचांनी संबंधित ठेकेदारांवर मनमानी केल्याचा आरोप केला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्राम मुंडीपार सडक येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या बांधकामा करीता ६३,४९,७६८ लक्ष रुपये मंजूरकरण्यात आले आहे. मुंडीपार गावातील लोकसंख्या १३२० इतकी असून एकूण घरांची संख्या ४४० आहे.

बांधकाम करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीची क्षमता ५२ हजार लिटर इतकी असून सदर नळ योजनेच्या माध्यमातून गावातील ४४० घरापर्यंत नळ योजना पोहोचविण्याचे प्रस्तावित आहे. अनेक गावांतील पाईपचा दर्जा वेगवेगळा असून, वापरलेले सिमेंट ,पाईप व साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरतअसल्याची माहिती प्राप्त आहे. पाईपलाईन नालीमध्ये दाबत असताना सिमेंट काँक्रीट केले गेलेले नाही फक्त माती टाकून पाईप बुजविण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या बांधकामा बद्दल ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचे आरोप करण्यात आले होते. ज्या कंत्राटदाराच्या नावाने प्रशासनाने निविदा काढून काम मंजूर केले तो संबंधित कंत्राटदार काम करत नसल्याने अन्य अघोषित कंत्राटदार पेटीत काम करीत असल्याची माहिती आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर व पाण्याच्या टाकीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेतील निकृष्ट दर्जाच्या बांधकामात प्रशासनाच्या कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार होत असल्याचे चित्र आहे. जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेतील निकृष्ट दर्जाच्या बांधकामांची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *