क्रिकेट जुगाराने घेतला तरूणाचा बळी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : क्रिकेटच्या जुगारात कर्जबाजारी झालेल्या २४ वर्षांच्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गोंदिया शहरातल्या श्रीनगर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. निरज कुमार मानकानी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण क्रिकेट सामन्यात पैसे गुंतवून जुगार खेळत होता, त्याने क्रिकेट सट्टेबाजीत बराच पैसा गुंतवला होता. भूतकाळामध्ये जवळपास दीड कोटी रुपये हरल्यानंतर तो कर्जबाजारी झाला होता. जुगाराच्या पैशाची वसुली करण्यासाठी सट्टेबाज त्याचा छळ करत होते, त्यामुळे तणावाच्या परिस्थितीमध्ये नीरजला कोणताही मार्ग दिसत नव्हता. अखेर निराश झालेल्या नीरजने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आयुष्य संपवले. नीरजचा एक भाऊ अमरावतीमध्ये राहतो तर त्याच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. नीरज त्याच्या आईसोबत गोंदियामध्ये राहत होता. २८ जुलैला नीरजची आई विदर्भ एक्स्प्रेसने नागपूरला निघाली. आईचा निरोप घेतल्यानंतर घरी आल्यावर नीरजने घरामध्ये स्वत:ला गळफास लावून घेतला.

शेजारचे मित्र नीरजला पाहण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना लटकलेला मृतदेह दिसला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले आणि त्यांनी नीरजचा मृतदेह बाहेर काढला. नीरजचे कोणतेच नातेवाईक तिथे नसल्यामुळे शवविच्छेदन होऊ शकले नव्हते. नातेवाईक आल्यानंतर शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. गोंदियामध्ये एका मोठ्या आॅनलाईन गेमिंग सट्टेबाजाचे पितळ उघडं झाल्यानंतर या क्रिकेट सट्टेबाजी प्रकारात आणखी किती जण बळी पडतात हे पुढे येणार आहे. निरजच्या सोबत या अवैध धंद्यात कोण गुंतले होते, आणि कोणामुळे नीरजने आत्महत्या केली, की त्याची हत्या करून आत्महत्येसारखे भासवण्याचा प्रयत्न केला?

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *