जि.प. उपाध्यक्षांचा शाळा विद्यार्थी व शिक्षकासोंबत पोषण आहाराचा आस्वाद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती यशवंत गणविर यांनी अर्जुनी मोरगाव व बोंडगावदेवी येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाला आकस्मिक भेट घेऊन विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा क्लास घेतला. अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात चालू तासिकेत सर्व वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना धडे देत असलेल्या शिक्षकांसमोर विद्यार्थी मित्रांशी हितगुज साधुन त्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधारण आढळली. बोंडगावदेवी येथील शाळेत तीच परिस्थिती आढळली.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गरीब, कष्टकरी, शेतकरी व मजुरांची मुले शिक्षण घेतात. त्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे व आपल्या हातून गुणवंत विद्यार्थी घडावे म्हणून शिक्षकांनी कसोशीने प्रयत्न केला पाहिजे, पायाभूत व अवांतर शिक्षणावर भर द्यावा, संविधानाच्या कलमांची दररोज विद्यार्थ्यांकडून नोंद करुन घ्यावी, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. दरम्यान बोंडगावदेवी येथील शाळेत उपाध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. शिक्षकांनाही सोबत बसवून शालेय पोषण आहाराची गुणवत्ता दररोज तपासण्याची सुचना दिली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी तसेच भौतिक व मूलभूत सुविधांची उणीव लवकरच दूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राकाँ तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, बालु नेवारे, संतोष बुक्कावन, मुख्याध्यापक व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *