साकोलीत चोरीचा प्रयत्न फसला

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी साकोली :शहरातील मुख्य बाजारपेठ चौकातील दोन मोबाईलचे दुकाने फोडण्याचा भुरटया चोरांकडून असफल प्रयत्न झाला. २१ आॅगस्ट रोजी सकाळी सदर प्रकार उघडकीस आला असून साकोली पोलीसांनी घटनास्थळी पोहचून चौकशीला सुरूवात केली. रविवारी मध्यरात्री जुन्या तहसिल कार्यालयाच्या बाजूचे जयशंकर टेलीकॉम सेंटर व जवळच असलेल्या बाजार चौकातील अभिनंदन मोबाईल गॅलरी या दोन्ही दुकानांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यात जयशंकर टेलीकॉम या दुकानाच्या आत शिरून काऊंटर मधील जवळपास दीड हजार रुपये चोरटयांनी लंपास केले. पण मोबाइल आणि साहित्यांना हात लावला नाही. त्यानंतर भुरटे चोरांनी आपला मोर्चा अभिनंदन मोबाईलकडे वळविला. यात दूकानाच्या शटरला लावलेले दणकट कुलूप फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र ते अपयशी ठरले. आज सकाळी घटनेची माहिती होताच सहायक पोलिस निरीक्षक संजय खोकले, पोलिस नायक प्रमोद बागडे आपल्या चमुसोबत घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून प्रकरणाची नोंद करण्यात आली. यावेळी पोलिसांनी परिसरातील दुकानांमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून सुगावा लावण्याचा प्रयत्न केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *