मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीतून ‘भाजपा चलो जाव’ चा नारा :- नाना पटोले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : भाजपाच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली एक वज्रमुठ बांधलेली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ आॅगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता, मोदी सरकारलासुद्धा मुंबईतील बैठकीतूनच ‘चले जाव’ चा नारा दिला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणाºया इंडिया आघाडीच्या बैठकीला आगळंवेगळं महत्व आहे. एनडीएमधील काही पक्षही इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात. या बैठकीला नितिशकुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांच्यासह ६ मुख्यमंत्री, विविध पक्षांचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खा. सोनियाजी गांधी, खा. राहुलजी गांधी हे उपस्थित असतील.

इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत, भाजपाकडेच या पदासाठी उमेदवार नाही. नरेंद्र मोदींना जनता कंटाळली आहे, त्यांची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल पण काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुलजी पंतप्रधान व्हावेत ही आमची भावना आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्याबरोबर काही सहकारी भाजपाशी हातमिळवून सत्तेत सहभागी झाले ते ते ईडीच्या धाकाने, विकासासाठी नाही, हे शरद पवार यांनीच स्पष्ट केले आहे. हेच लोक मागील अनेक वर्षांपासून सत्तेत होते मग त्यांनी काय विकास केला ते सांगावे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम जवळपास १७ वर्षांपासून सुरु आहे मात्र हा रस्ता पूर्ण होत नाही. या रस्त्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, भाजपाचे लोकच या रस्त्याच्या कंत्राटात भागिदार आहेत, कमीशनच्या वादातून हा रस्ता पूर्ण होत नाही. अनेक कंत्राटदार काम सोडून पळून गेले आणि त्याचा फटका मात्र कोकणच्या लोकांना बसत आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची चौकशी करावी म्हणजे, ‘दूध का दूध, पाणी का पाणी होईल’ . ‘शासन आपल्या दारी’ अभियानावर जनतेच्या पैशाची लुट चालली आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील योजनाच हे सरकार राबवत आहे आणि त्याचे श्रेय मात्र स्वत: लाटत आहे. ज्याठीकाणी हा कार्यक्रम होतो, तिथली जनता सरकार बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करते, असेही नाना पटोले म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *