संगमनेर प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : संगमनेर येथे मागासवर्गीय भटक्या मांग गारुडी समाजाच्या दोन व्यक्तींच्या झालेल्या अमानवीय कृत्याचा निषेध करीत, यातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशा आशियाचे एक निवेदन भंडारा जिल्हाधिकायांमार्फत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या वतीने पाठवण्यात आले आहे. १४ सप्टेंबर रोजी भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या माध्यमातून एक निवेदन राज्याची उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

संगमनेर येथील संतोष आणि जगन राखपसरे यांना तीन व्यक्तींकडून १ सप्टेंबर रोजी मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळही करण्यात आली. याच जुन्या भांडणावरून २ सप्टेंबर रोजी पुन्हा रस्त्याने जात असताना दोघांना मारहाण केली गेली. विशेष म्हणजे मारहाणीच्या वेळी खाली पडलेल्याराखपसरे यांच्या अंगावर लघुशंका करण्यात आली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणा-या या लोकांविरुद्ध अ‍ॅक्ट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना संस्थेचे प्रांत सहसचिव श्रीकांत तिजारे, विभाग संयोजक शिवा कांबळे, तालुका प्रमुख रामसिंग शेंडे, धरण बिसने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.