तब्बल दोन तास झोडपले मुसळधार पावसाने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज सकाळपासूनच काळे- कुट्ट आभाळ दाटून आले. असे वाटले की आज आभाळ फाटून भंडारा जिल्हा जलमय होतो की काय? अशा विचारात असतांनाच सकाळी १० वाजता धो…धो पावसाला सुरुवात झाली. तब्बल २ तास मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपल्याने भंडारा तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्यातील शेतशिवारात पाणी शिरल्याने पुर्ण परीसर जलमय झाले. काहीच्या घरातसुद्धा पाणी घुसले. दोन तास १०० मिलीमीटर पाऊस बरसल्याने नागरिकांची धावपळ उडाली. कौलारू घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मातीचे घरे व गुरांच्या गोठ्याची पडझड झाली. यामुळे जनजीवन प्रभावित झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. लोंबीवर असलेले हलके धान अतिवृष्टीने जमिनीवर लोळले. तर भारी धान पिकाचा फुलोरा झडल्याने उत्पादनात मोठी घट येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात दोन आठवड्यापासून दमदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील ४ मध्यंम, ३१ लघु प्रकल्प, २८ मामा तलाव प्रकल्पांच्या जलसाठ्यात भरीव वाढ झाली आहे. आधीच तुडूंब भरलेली मामा तलाव, लघु प्रकल्प व मध्यंम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यात पडणाºया सरासरी ११०४.३ मिलिमीटर आहे. तर सध्यास्थितीत १०६० मिलिमिटर पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.

पडलेल्या पावसाची टक्केवारी ९६ इतकी आहे. आणखी काही दिवस मुसळधार पाऊस झाल्यास खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागण्याचा अंदाज आहे. तर सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. गत आठवड्यात धरण व कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने पीके नेस्तनाबूत झाली होती. त्या त्रासदीत सध्या होत असलेल्या मुसळधार पाऊसाने आणखी भर पडली आहे. वरूण राजाला आता तरी थांब, अशी विनवणी शेतकरी करतांना दिसून येत आहेत. जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असला तरी वैनगंगा नदीने धोक्याची पातळी गाठलेली नाही. वैनगंगा धोक्याच्या इशाºयापासून दीड मीटरने खाली आहे. कारधा येथील वैनगंगेची धोका पातळी २४५ मीटर असून सध्या नदीची पातळी २४३.५७ मीटर इतकी आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *