शरद पवारांसोबतचे ‘ते’छायाचित्र आयुष्यातील एक आठवण!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : भारताच्या इतिहासातील तो स्वर्णिम क्षण होता. नविन संसदेतील भवनात आम्ही पहिल्यांदा प्रवेश केला होता. तिथे शरद पवार यांच्याशी योगायोगाने भेट झाली. आयुष्यातील एक आठवण म्हणून फोटो काढला. यात राजकारण हा विषयच नव्हता. शरद पवार आमच्यासाठी आदर्श आहेत वंदनीय आहेत, त्यांच्याबद्दल मी कोणतंही भाष्य यापूर्वी कधी केलं नाही आणि करणारही नाही. आता लोकांनी याचा वेगळा अर्थ काढला असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. हे छायाचित्र नेहमी स्मरणात रहावं याकरिता मी प्रसारित केलं होतं. याला लोक राजकारणाशी जोडत असतील तर त्याला अर्थ नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया येथील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. पटेल हे दोन दिवसांच्या गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या दौºयावर असताना त्यांनी काही काळ आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधाला. या प्रसंगी मराठा आरक्षणावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की मराठा आरक्षणावर न्यायालयाने त्यावेळी वेगळा निकाल दिला होता. त्यावेळी संवैधानिक जी अडचण आहे ती सर्वोच्च न्यायालयाने सांगितली होती.

हा विषय कोणत्याही पक्षाने राजकारणाचा करू नये. कारण सगळ्या सरकारमध्ये याकरिता प्रयत्न होवून कुठे न कुठे अडचण निर्माण झालेली आहे. काल परवाच यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. हा एक चांगला निर्णय होता. कारण सगळ्यांनी बसून सगळ्यांच्या सल्ल्यानेच यावर तोडगा निघू शकणार आहे. पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे पूर्वोत्तर राज्यातील निवडणुकीत सहभाग घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे पटेल म्हणाले. यापूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागालँड येथे ७ आमदार निवडून आले होते. अरूणाचल, मणिपूर, मेघालय येथेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५ आमदार निवडून आलेले आहेत. पूर्वोत्तर राज्यात आमच्या पक्षाचे संगठन मजबूत राहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या निवडणूकीत येथे लढणार असल्याचे सूतोवाच पटेल यांनी केले. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर शिंदे सरकारचे भविष्य काय राहणार यावर मात्र त्यांनी इशारा करून बोलण्याचे टाळले. या वेळी त्यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.