भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोेंदिया : गोरेगाव पोलिसांनी चोरी गेलेल्या पाच दुचाकी जप्त करुन दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई १ आॅक्टोबर रोजी करण्यात आली. प्रशांत सयाम (१९, रा. बिरडीटोला) व साहिल बिसेन (१९, रा. बाम्हणी) अशी आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यात दुचाकी चोरीचा शोध घेत असताना गोरेगाव पोलिसांना गोंदिया तालुक्यातील चुलोद येथे एक व्यक्तीचोरीची दुचाकी विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चुलोद येथे जाऊन प्रशांत सयाम याला ताब्यात घेऊन चौकशी केली. प्रसंगी त्याने आपला साथीदार साहिल बिसेन याच्यासहपाच दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी प्रशांत सयाम यांच्याकडूनएमएच ३५, एक्स ५२४० व २ विना क्रमांकाच्या दुचाकी जप्त केल्या. तसेच साहिल बिसेन यांच्याकडून गोरेगाव तालुक्यातील बाम्हणी येथून एमएच ३५, यू २१७४ व सटवा डव्वा येथून विना क्रमांकाची दुचाकी जप्त केली . दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोनि अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनात सपोनि गोसावी, सफौ राजकुमार पवार, पोहवा रमेश पटले, सुनिल वानखेडे, पोशि सुरेश रहांगडाले, कमलेश गराट, शैलेंद्र बोंदरे, तिरंजीव कुमडे, चाचेरे, निकेश राठोड यांनी केली.