मृतक योगेश नगरकर यांच्या आत्महत्या संबंधिचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी फोडले कपाट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर येथील प्राचार्या निता पिसे, सचिन पंचबुधे, अर्चेश बिसने आणि सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांच्या जाचाला कंटाळुन तुमसर आयटीआय येथील शिल्पनिदेशक योगेश नगरकर यांनी शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला आत्महत्या केली होती. त्यानंतर आत्महत्ये संदर्भात नागपूर येथील अंबाझरी पोलिसांकडुन आणि प्रादेशिक कार्यालय नाशिक येथील सहसंचालक प्रफुल्ल वाकडे यांच्याकडुन चौकशी करण्यात आली होती. परंतु चौकशीपुर्वीच मुख्य आरोपी प्राचार्या निता पिसे आणि सहआरोपींना तात्काळ निलंबित करणे अत्यंत गरजेचे होते, जेणेकरून कोणीही दबावात बयान दिले नसते आणि आरोपींकडुन पुरावे नष्ट करणे शक्य झाले नसते. परंतु आरोपींविरूद्ध प्रशासनाकडुन एक महिन्याच्या कालावधी लोटूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही आणि चौकशी होईपर्यंत कोणतीही कार्यवाही न करणारे आरोपी सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांनीच प्राचार्या निता पिसेचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी येथे त्यांच्या सोईप्रमाणे स्थानांतरण आदेश काढले.

तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर येथील सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांच्यावर पीडित कुटुंबाचे असलेल्या आरोपामुळे दिनांक ५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार त्यांची तडकाफडकी बदली मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आली आहे. सदर दिनांक ५ आॅक्टोबरला महत्वाचे कागदपत्रे व साहित्य घरी दिसत नसल्याने आणि आत्महत्येपूर्वी महत्वाचे पुरावे संस्थेतील सिलबंद कपाटात सापडतील या उद्देशाने मृतक योगेश नगरकर यांचे भाऊ निलेश नगरकर यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई येथील संचालक दिगंबर दळवी यांना पत्र पाठवून व रीतसर परवानगी घेऊन तुमसर आयटीआय येथील संस्थेत प्रत्यक्ष पाहणी केली असता आत्महत्या करण्यापुर्वी योगेश नगरकर यांनी कपाटाला लावलेली सिल फोडलेल्या अवस्थेत आढळली.

याबाबत निलेश नगरकर यांनी सांगितले की, आरोपी सहसंचालक पुरूषोत्तम देवतळे यांच्या सुचनेनुसार प्राचार्या निता पिसे, सचिन पंचबुधे, अर्चेश बिसने, अनिल रोडके, शालिनी कटरे यांनी मृतक योगेश नगरकर यांनी कपाटाला लावलेली सिल नगरकर कुटुंबास तसेच पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता स्वत: पंचकमिटीचे कार्यालयीन आदेश काढून कपाट फोडले आहे. त्यामुळे नगरकर कुटुंबाने आरोप केले की, शिल्पनिदेशक योगेश नगरकर यांच्या आयटीआय येथील कपाट प्राचार्या निता पिसे यांनी हेतुपुरस्सर फोडून पुरावे नष्ट केले असल्याचे सांगितले. तसेच सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आरोपीने गुपचुप कपाट फोडुन पुरावे नष्ट केल्यानंतर आता कपाट फोडणे अंगलट येऊ शकते आणि प्रकरण शांत होण्याच्या उद्देशाने आरोपी सहसंचालक पुरूषोत्तम देवतळे यांनीच प्राचार्या निता पिसेचे भंडारा जिल्ह्यातील पवनी आयटीआय येथे सोयीप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात तडकाफडकी स्थानांतरण केल्याने त्यांच्याविरुद्ध लावलेले आरोप सिद्ध होत असल्याचे सुद्धा निलेश नगरकर यांनी प्रभारी प्राचार्या जयश्री निंबार्ते यांच्याकडे निवेदनाद्वारे सांगितले. तसेच याप्रकरणाची तक्रार शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई येथील संचालक दिगंबर दळवी यांच्याकडे केली आहे. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच. मेश्राम, रोहित चव्हाण, पवन हरडे, जगदीश नर्सिंगपूरकर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *