हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. सोमवारी बीडमध्ये घडलेल्या घटनेचं समर्थन करता येणार नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. आजही त्याबाबत काही निर्णय घेण्यात आले आहेत. पण काही लोक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. हिंसाचारामध्ये असलेल्या काही लोकांची ओळख पटली आहे. आम्हाला सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यात दिसणाºया व्यक्तींनी लोकांना जिवंत जाळण्याचा देखील प्रयत्न केला आहे. त्यामुळं कलम ३०७ अन्वये कारवाई केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यात जे काही आंदोलन सुरू आहे, त्याबाबत राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत वचन दिलं आहे.

यासाठी राज्य सरकारही पूर्णपणे ते वचन पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. याबाबत मंत्रिमंडळानेसुद्धा सकारात्मक निर्णय घेतले आहेत. परंतु काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काल बीडमध्ये काही लोकांनी लोकप्रतिनिधींच्या घरी आगी लावणे, काही विशिष्ट समाजाच्या लोकांचे घर पेटवणे, हॉटेल व दवाखान्याचे नुकसान करणे अशा पद्धतीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेची गांभीयार्ने दखल राज्य सरकारने घेतली असून अशा लोकांवर पोलीस व गृह विभाग कडक कारवाई करेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हत्येचे गुन्हे दाखल करणार : राज्यात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आहेत. हिंसाचार करून जर कोणाला मारण्याचा किंवा मालमत्तेचं नुकसान करण्याचा प्रयत्न होत असेल तर हत्येचा प्रयत्न करण्याचे गुन्हे दाखल करणार आहे. शांततेत आंदोलन करणाºयांना कोणतीही बंदी अथवा कारवाई केली जाणार नाही. पोलिसांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवलाय. सुरक्षेसाठी अधिक तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळं आंदोलन शांततेत करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. कोणाला मारून टाकण्याचा प्रयत्न, कोणाची प्रॉपर्टी जाळण्याचा प्रयत्न होत असेल तर पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत. म्हणून या सर्व लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिथे शांततेत आंदोलन सुरू आहे, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. शांततेत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु हिंसेला कुठल्याही प्रकारची थारादेण्यात येणार नाही. यासाठी अतिरिक्त फौज फाटा मागविण्यात आलेला असून, त्यांना ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. जोपर्यंत अशा लोकांना पकडले जात नाही तोपर्यंत पोलिसांची कारवाई ही सुरूच राहणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.