कोण बाजी मारणार; मोहाडी तालुक्याचे लागले लक्ष

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : या तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकीत कांद्री, जांब, एकलारी, वरठी, आंधळगावात ‘हाय व्होल्टेज’ लढती होत आहेत. या लढतीकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. एक ग्रामपंचायत अविरोध निवडून आली. त्यामुळे ५७ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचाराला तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. शेवटच्या टप्प्यात प्रचाराची धूम सुरू आहे. राष्ट्रवादीचे दोन गट, भाजपा व भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या समर्थित पॅनल मध्ये लढती होणार आहेत. कांद्री ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण आठ उमेदवार लढतीमध्ये आहेत. या लढतीमध्ये कांद्री मूळ गावातील माजी आमदार चरण सोविंदा वाघमारे तसेच आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांचे खंदे समर्थक असलेले प्रमेश नलगोपुलवार यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार असल्याची चर्चा आहे. कांद्री येथील सरपंचाची निवडणूक माजी आमदार चरण सोविंदा वाघमारे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमेश नलगोपुलवार यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. तसेच जांब ग्रामपंचायत मध्ये भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार गट)यांनी युती केली आहे.

युती समर्थक पॅनल कडून माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या नलिनी जगदीश कोरडे विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी पत्नी वसुंधरा यांना आपल्या पक्षाच्या पॅनल कडून सरपंचपद निवडणुकीत पत्नीला आपल्या पक्षाच्या समर्थित पॅनलकडून मैदानात उतरवले आहे. दोन्ही गटाचे जांब ग्रामपंचायतमध्ये प्रबळ प्रस्थ असल्याने येथेही भारी लढत होणार आहे. तसेच तिसरा उमेदवार दोघांच्या विजयाचे समीकरण बदलू शकते. एकलारी ग्रामपंचायत मध्ये आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांचे भाऊ विश्वनाथ कारेमोरे राष्ट्रवादी (अजित पवार गट)या पक्षाच्या पॅनल कडून सरपंच पदासाठी उभे आहेत. त्यांच्या लढा भाजपा समर्थित उमेदवार महेंद्र बालपांडे यांच्याशी आहे. एकलारीत लढत आमने सामने होत असून येथे सुद्धा प्रबळ व प्रतिष्ठित लढतीचे चिन्ह दिसून येत आहेत. तसेच वरठी ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या भक्कम आहे. तसेच या निवडणुकीत आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांची कसोटी लागणार आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) असलेले उमेदवार माजी पंचायत समिती सदस्य संजय मिरासे यांची लढत भाजपाचे उमेदवार चांगदेव रघुते तर बी.आर.एस.समर्थित पॅनलचे उमेदवार आनंद गजभिये तर एक स्वतंत्र उमेदवारांशी हाय व्होल्टेज लढत होणार आहे.

सातोना ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश हटवार सरपंच पदासाठी उभे आहेत. सातोना येथे पाच उमेदवार असून येथेही चांगली लढत होणार आहे. अनेक ५७ ग्रामपंचायत मध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आघाड्या करून निवडणूक लढवत आहेत. तालुक्यातील कांद्री, वरठी, करडी, एकलारी, जांब, आंधळगाव, डोंगरगाव, रोहना, कुशारी, हमारी बुद्रुक आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही प्रचार रॅलीचे फॅड सुरू झाले आहे. होम टू होम प्रचाराने वेग घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी दारूचे गुत्ते सुरू झाले आहे. शेतात, ढाब्यावर तसेच बार मध्ये जेवणावळी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. कारण मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीची निवडणूक सर्व पक्षांना आरसा दाखवणारी ठरणार आहे. तसेच पुढे तुमसर -मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागणार असून आपले अधिकाधिक सरपंच व सदस्य निवडून आणण्यासाठी नेतेमंडळी मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत च्या निवडणुकीत सक्रियपणे रस घेऊ लागले आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *