संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा अन्यथा खासदारांनी राजीनामे द्यावे

मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत चिघळला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घ्यावं आणि उपोषणं सोडावं. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी तसंच मराठा आंदोलकांनी कुठेही जाळपोळ करू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केलं आहे. मराठा समाजाने शांतता बाळगणं गरजेचं आहे. जर कोणी आंदोलकांना भडकवत असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी, यामागे कोणाचे कारस्थान आहे का? हे पाहायला पाहिजे असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलकांचा आक्रोश लक्षात घेऊन राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्न ताबडतोब मार्गी काढला पाहिजे. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ताबडतोब पावले उचलावी आम्ही सरकारसोबत आहोत, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. केंद्र सरकारमध्ये असलेल्या राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत ठाम भूमिका घ्यावी. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आरक्षण प्रश्नावर भूमिका घेऊ शकतात. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रावर दबाव आणावा. प्रसंगी सर्व खासदारांनी या प्रश्नावर राजीनामे द्यायला हवेत असे आवाहन ठाकरे यांनी केलं आहे. राज्यातील काही आमदार मराठा आरक्षण प्रश्नी राजीनामे देत आहेत. मात्र त्यांच्यावर असलेला गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी केवळ हा त्यांचा खटाटोप असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. तसंच राज्य सरकारचं ‘शासन आपल्या दारी’ म्हणजे केवळ थोतांड असल्याचंही त्यांनी म्हटंले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *