नक्षलवाद्याकडन गाव पाटलाची गोळ्या झाडन हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम टिटोळा येथे सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा आरोप करून नक्षलवाद्यांनी गाव पाटलाची गोळ्या झाडून निर्घुन हत्या केल्याची घटना २३नोव्हेंबरला रात्री ९ वाजता दरम्यान उघडकीस आली. घटनेनंतर नक्षलवाद्यांनी तेथे पत्रक टाकले असून त्यात गाव पाटलाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलिस तसेच स्थानिक नेत्यांवर आरोप केले आहेत. लालसू वेलदा (६३) रा. टिटोळा ता. एटापल्ली असे हत्या झालेल्या गाव पाटलाचे नाव आहे. हेडरी पोलिस ठाणे हद्दीतील जांबिया ग्रामपंचायत अंतर्गत टिटोळा गावात हा थरार घडला. गाव पाटील लालसू वेलदा हे स्वत:च्या घरी होते. रात्री ९ वाजता सशस्त्र नक्षलवादी त्यांच्या घरात शिरून कुटूंबासमोरच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. दरम्यान, या घटनेनंतर नक्षल्यांनी एका माजी जिल्हा परिषद सदस्यासह गावातील एका युवकाला व दोन लहान मुलांनाही मारहाण केल्याची माहिती आहे. हत्येनंतर घटनास्थळी पत्रक आढळले. त्यातसुरजागड लोह खाणीचे समर्थन व पोलिसांसाठी काम करत असल्याने गाव पाटलाची हत्या केल्याचा दावा नक्षलवाद्यांच्या गडचिरोली डिव्हिजन कमेटीने केला आहे. यासाठी स्थानिक नेते व हेडरीचे उपअधीक्षक जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. लालसू यांचा मुलगा पोलिस दलात कार्यरत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *