प्रत्येकाने अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करावी – पालकमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : समता, स्वातंत्र्य व न्याय या विचारांचे पालन करुन सर्व नागरिकांनी अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करावी, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज येथे केले. गोंदिया येथील नेहरु चौकात अहिंसा द्वारचे भूमीपुजन करतांना श्री. आत्राम बोलत होते. आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, न.प.चे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रारंभी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते गोंदिया येथील नेहरु चौकात नियोजित जागी कुदळ मारुन विधीवत अहिंसा द्वारचे भूमीपुजन करण्यात आले.

पालकमंत्री श्री. आत्राम म्हणाले, नगर विकास विभागाद्वारे नगर परिषद निधी अंतर्गत ३० लक्ष रुपये खर्च करुन गोंदिया येथील नेहरु चौकात सुंदर असा अहिंसा प्रवेशद्वार तयार करण्यात येत आहे. सदर द्वार हा लोकांना शांती व अहिंसेची प्रेरणा देणारा प्रवेशद्वार असणार आहे. जैन धर्माने अहिंसा, शांती व सत्त्याचा संदेश दिलेला आहे, त्यांचे विचार आचरणात आणावे असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद जैन व जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनीही आपले विचार व्यक्त केले. गोंदिया शहरवासियांची बºयाच दिवसापासून स्वयंचलित शवदाहिनी यंत्राची मागणी होती. सदर मागणीची नगर परिषद गोंदिया द्वारे १ कोटी १५ लाख रुपये खर्च करुन पुर्तता करण्यात आली असून आज नेहरु चौकात पालकमंत्र्यांच्या हस्ते फित कापुन स्वयंचलित शवदाहिनी यंत्राचे आॅनलाईन लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.प.चे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन न.प. प्रशासन अधिकारी शिक्षण रविंद्रकुमार अंबुले यांनी केले तर उपस्थितांचे आभार न.प. प्रशासकीय अधिकारी चुन्नीलाल राणे यांनी मानले. कार्यक्रमास संजय जैन, निखिल जैन, माधुरी नासरे, कुंदा दोनोडे, अशोक शहारे, जैन धर्माचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *