७ औद्योगिक ग्राहकांकडील ५२ लाखाची वीजचोरी उघड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर :- महावितरणचे भरारी पथक आणि लष्करीबाग उपविभाग यांनी संयुक्तपणे राबविलेल्या औद्योगिक ग्राहकांकडील वीजचोरी विरोधी मोहीमेत सात औद्योगिक ग्राहकांकडील सुमारे ५२ लाख ५५ हजाराची वीजचोरी उघडकीस आली आहे. यापैकी चार ग्राहकांनी वीजचोरीच्या १८ लाख २५ हजार ९९९ आणि तडजोडीपोटी १० लाख ६० हजार दंडाच्या रकमेचा भरणा देखील केला. महावितरणच्या लष्करीबाग उपविभागांतर्गत नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण मंडलांचे भरारी पथक व लष्करीबाग उपविभागातील अभियंता आणि कर्मचा-यांनी राबविलेल्या या संयुक्त मोहीमेत नारी आणि कामठी रोड परिसरातील सात ग्राहकांकडील तब्बल ३ लाख १४ हजार ७५३ युनिटची वीजचोरी उघडकीस आली. या चोरीचे अंदाजित मुल्य सुमारे ५२ लाख ५५ हजार १४० रुपये असून या सातही ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सातपैकी सहा प्रकरणांत दुस-या ग्राहकाकडील इनकमिंग केबलला टॅप करुन मीटर बायपास करण्यात आला होता तर एका ठिकाणी रिमोटच्या सहाय्याने वीजचोती होत असल्याचे निदर्शनास आले.

या सातही वीज ग्राहकांना वीजचोरीपोटी ५२ लाख ५५ हजार १४० रुपये अधिक तडजोडीपोटी २० लाख ९० हजाराच्या दंडाची आकारणी करण्यात आली यापैकी चार ग्राहकांनी वीजचोरीसाठी १८ लाख २५ हजार ९९९ आणि तडजोडीपोटी १० लाख ६० हजार दंडाच्या रकमेचा भरणा देखील केला. ही मोहीम महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी, मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) श्री सुनिल थापेकर, कार्यकारी अभियंता श्री राजेश घाटोळे यांच्या मार्गदर्शनात अतिरीक्त कार्यकारी अभियंता सर्वश्री हेमेंद्र गौर, श्रीकांत तळेगावकर आणि विवेक राऊत आणि त्यांच्या सहका-यांनी यशस्वीपणे पार पाडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *