रामललाची ‘ड्रेस डिझायनर’ आहे विदर्भकन्या !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : अयोध्येत श्रीराम ललाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी आता अंतिम टप्प्यावर आली असून, प्रत्येक भारतीय आपापले योगदान या संपूर्ण आयोजनात देतो आहे. देवी-देवतांच्या मूर्तींची षोडशोपचाराने पूजा करण्यासोबतच, त्यांना देखणे दागिने आणि तलम वस्त्र नेसविण्याची आपली प्रथा आहे. अयोध्येत श्रीराम बालस्वरूपात असल्याने, त्यांची वस्त्रं कशी असतील? याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. श्रीरामरायासाठी सुरेख रंगसंगतीची कपडे शिवण्याचे अर्थात रामललासाठी ‘ड्रेस डिझायनिंग’ करण्याची सुवर्णसंधी विदर्भकन्या सोनाली खेडकर हिला मिळाली. श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक सोहळ्यात, सोनालीचं हे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. यवतमाळच्या नागपुरे दाम्पत्याची कन्या आणि पुण्याच्या खेडकर कुटुंबाची स्नुषा असलेल्या सोनालीचं पुण्यात ह्यसावरी बाय सोनाली’ हे बुटीक आहे. पुण्यातील उद्योजिका आणि रामभक्त अनघा घैसास यांनी ह्यदो धागे श्रीराम के नाम’ या अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं. तब्बल साडेबारा लाख रामभक्तांच्या हस्ते हातमागावर रामवस्त्रांसाठी रेशमी कापड विणल्या गेलं. या कापडाची वस्त्रं डिझाईन करून शिवण्याची जबाबदारी अनघाताईनी विश्वासाने सोनालीवर सोपविली. त्यांनी आधीदे- खील सोनालीच्या कामाचा दर्जा आणि झपाटा पाहिलेला होता.

सोनालीच्या हातून मर्यादीत वेळेत दर्जेदार काम होईल, हा त्यांचा विश्वास सार्थ ठरला. ‘रामललाच्या मूर्तीची सविस्तर माहिती घेण्यापासून आमच्या कामाची सुरुवात झाली. देगलूरकर सरांकडून सविस्तर माहिती मिळाली आणि मूर्ती५१ इंचांची असल्याचे त्यांनी सांगितले. आता, ५१ इंचाच्या मूर्तीच्या मापाचा हिशोब कसा घ्यावा? हा प्रश्न मला पडला. पण, रामरायानेच मला मार्ग दाखवला. एक दिवस माझ्याकडे एक कस्टमर आपल्या लहानशा मुलीसोबत आली. काय प्रेरणा झाली माहिती नाही पण, मी त्या मुलीची उंची मोजली आणि ती अचूक ५१ इंच होती. आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याची जाणीव होती. अनघाताईंनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि कामाचंही स्वातंत्र्य दिले. माझ्या कारागिरांमध्ये उत्साह संचारला, सोनालीने प्रतिनिधीला ही माहिती दिली. तब्बल दोन दशकांचा अनुभव पणाला लागला. त्यातून, रेशमी वस्त्राची उपरणं, सोवळं आणि अंगरखा अशा तीन कपड्यांचा एक सेट असे आठ सेट तयार करण्याचं ठरले. ‘चिपळूणला माझ्या सासरचं मुरलीधराचे मंदीर आहे. तिथे ४८ इंचाची मूर्ती आहे. त्या मूर्तीसाठी मी काही वर्षांपूर्वी कपडे शिवले होते. मी ते कपडे मागवले आणि त्यावरून काही संकल्पना सुचत गेल्या.

देवावर श्रद्धा आणि मनात सात्त्विक भाव ठेवून काम सुरू केलं. थोडं संशोधन, अनुभव आणि कल्पना यातून रामललाची वस्त्रं घडली. रंगसंगती, जरीच्या काठांचं काम, कशिदाकारी, मोतीकाम करून रामललाच्या वस्त्रांचं सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न केला. एकूण आठ सेट आम्ही तयार केले आणि प्रत्येकाचा लूक वेगळा केला आहे, सोनालीने सांगितले. ती म्हणाली की, हे काम सुरू असताना बुटीकमध्ये नवचैतन्याची जाणीव होती. रामरायाची वस्त्रं असल्यामुळे पावित्र्य राखण्याचे आमचे प्रयत्न होते. स्वच्छतेची विशेष काळजी घेत निर्धारीत वेळेत आम्ही कपडे शिवून पूर्ण केले. कशिदाकारी आणि मोतीकाम करणारे सगळे मुसलमान कारागिर! पण, कर्म हीच पूजा समजून त्यांनी जीव ओतून काम केलं. २४ बाय ७ आम्ही राममय झालो होतो. कपडे तयार झाले आणि ते देताना सगळे भावूक झाले. जणू काही राम ललाच आमच्यातून दुसरीकडे निघाला होता. श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या अभूतपूर्व सोहळ्यात विदर्भकन्येचं हे योगदान कौतुकास्पद आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *