बाळाला सांभाळले डॉक्टर तरुणींनी,घडविले उदात्त माणुसकीचे दर्शन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : सरकारी रुग्णालय वा दवाखान्यातील डॉक्टरांचा कोरडेपणा, शिष्टपणा आणि एरंदरितच वागणुकीबद्दल लोकभावना तीव्र असतात. काही अंशी ते खरे असेलही. पण, ही लोकभावना संपवणाºया, डॉक्टरी प्रतिमेला उजाळा देणाºया उदात्त माणुसकीचे दर्शन शासकीय दंत रुग्णालयातील पदव्युत्तर डॉक्टरांनी घडविले. शहर असो वा ग्रामीण, सरकारी रुग्णालय वा दवाखान्याबद्दल अनेक लोकांची भावना तीव्र आहे, हे तेवढेच खरे आहे. वैद्यकीय खर्च न परवडणारे अनेक लोक नाईलाजास्तव सरकारी रुग्णालयात उपचार घेतात. या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तेथील डॉक्टर्स, कर्मचाºयांच्या भावना तीव्र असतात. पण, तरीही या रुग्णालयात गर्दी असते. शासकीय दंत रुग्णालयसुद्धा यास अपवाद नाही. केवळ नागपूरच नव्हे तर विदर्भ, मध्य भारतातून रुग्ण येतात. रोज रुग्णांची गर्दी प्रत्येक विभागात रोज ४०० ते ५०० रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार होत असतात. त्यामुळे तेथील डॉक्टर्स व कर्मचाºयांची धावपळ सुरू असते. रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना पाणी पिण्यासही फुरसत नसते. मंगळवारी अशीच गर्दी होती. कॉन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री अ‍ॅण्ड एन्डोडोन्टीक्स या पदव्युत्तर विभागातही उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गर्दी होती.

एक महिला आली. तिच्याजवळ तान्हुला होता. तिला घेऊन दातावर उपचार शक्यच नसल्याने डॉक्टरांनी बाळाला कुणाजवळ देण्यास सांगितले. जमिनीवर ठेवते, असे ती म्हणाली. पण, या खोलीत पुरेशी जागाही नव्हती. त्या महिलेसोबत बाळाला सांभाळण्यासाठी कुणीच नव्हते. खाली ठेवायला जागाही नव्हती. करावे तरी काय, असा प्रश्न त्या महिलेसमोर होता. एका रुग्णावरील उपचारसंपल्याने रिकामी झालेली पदव्युत्तर डॉक्टर तरुणी पुढे आली. तिने त्या बाळाला कडेवर घेऊन खेळवले. इकडे त्या महिलेवर डॉक्टरांनी लगेचच उपचार सुरू केले. पाच-सात मिनिटांनी दुसरी डॉक्टर तरुणी रिकामी झाली. तिने त्या बाळाला खेळवले. असे दोन-तीन डॉक्टर तरुणींनी बाळाळा खेळवले, तोपर्यंत त्या महिलेवरील त्या दिवशीचा उपचार पूर्ण झाला होता. ती प्रसन्न मनाने बाळाला घेऊन परतली. वरून साधा दिसणारा हा प्रसंग. पण, तो खुप काही सांगून गेला.

डॉक्टर पदवीधर होऊन पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या या तरुणी. पण, आयुष्याची, करिअरची सुरुवात होत असताना त्यांच्या अंत:करणात सहकार्याची मदतीची, माणुसकीची भावना प्रबळ होती. मुख्य म्हणजे डॉक्टर म्हणून कुठलाही अहंभाव नव्हता. सरकारी रुग्णालयातही चांगल्या स्वभावाची माणसे असतात, हा महत्त्वपूर्ण संदेशही हा छोटासा प्रसंग देऊन गेला. सरकारी रुग्णालयात काहींकडून कडवट वागणूक मिळत असेलही. त्यांचा स्वभाव व इतरही कारणे असू शकतात. पण, म्हणून सर्वच तसे असतील, असे समजण्याचे कारण नाही. किमान नव्या पिढीत हा गुण कमीच झालेला असेल, हेच या प्रसंगाने दाखवून दिले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *