खंडाळा शिवारात भीषण अपघात; उभ्या ट्रकला भरधाव कार धडकली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर/मौदा : रामटेक शहरानजीकच्या गडमंदिरातून दर्शन आटोपल्यानंतर भेंडारकर व बोंदरे कुटुंबीय कारने परतीच्या प्रवासाला निघाले. वाटेत वेगात असलेल्या चालकाचा ताबा सुटला आणि सुसाट कार रोडलगत उभ्या असलेल्या ट्रकच्या मागच्या भागावर धडकली. यात कारमधील चिमुकल्यासह मुलगी व वृद्धाचा मृत्यू झाला असून, दोन कुटुंबांतील सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे. ही घटना अरोली (ता. मौदा) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामटेकभंडारा मार्गावरील खंडाळा शिवारात रविवारी (दि. ९) दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली. परसराम लहानू भेंडारकर (वय ७०), त्यांचा नातू हिमांशू राजेश भेंडारकर (८ महिने) व भार्गवी चंद्रहास बोंदरे (८) अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये पत्नी सीताबाई परसराम भेंडारकर (६४), मुलगा तथा कारचालक राजेश परसराम भेंडारकर (३४), सून दुर्गा राजेश भेंडारकर (३२), नात उन्नती राजेश भेंडारकर (५), मेघा चंद्रहास बोंदरे (३१), भाव्या चंद्रहास बोंदरे(८), सर्व रा. सोनकापाळसगाव, ता. साकोली, जिल्हा भंडारा यांचा समावेश आहे.

भेंडारकर व बोंदरे यांची कौटुंबिक मैत्री असून, दोन्ही कुटुंबातील एकूण नऊजण रामटेक परिसरात रविवारी सकाळी फिरायला आले होते. त्यांनी गडमंदिरात श्रीराम व सीतामाईचे दर्शन घेतल्यानंतर एमएच-३६/एच-८४०३ क्रमांकाच्या कारने परतीचा प्रवास सुरू केला. ते खंडाळा शिवारात पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार रोडलगत उभ्या आलेल्या एमएच-४०/सीडी-९८०२ क्रमांकाच्याट्रकवर मागून आदळली. यात परसराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य आठजण गंभीर जखमी झाले. ठाणेदार निशांत फुलेकर यांनी सहकाºयांसह घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. परसराम यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी, तर जखमींना उपचारासाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तिथे सर्व जखमींवर प्रथमोपचार करून नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले. हिमांशू व भार्गवी या दोघांचा नागपूर शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक किशोर चव्हाण यांनी दिली.

याप्रकरणी अरोली पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि २८३, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सुरक्षात्मक उपाययोजनांना फाटा एमएच-४०/सीडी-९८०२ क्रमांकाच्या ट्रकचालकाने ट्रक खंडाळा शिवारात रोडलगत उभा केला होता. परंतु, ट्रकभोवती त्रिकोणी चिन्हे लावणे, दगड लावणे अथवा झाडांच्या फांद्या लावणे किंवा ट्रकचे इंडिकेटर सुरू करणे यापैकी कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना केल्या नव्हत्या, अशी माहिती ठाणेदार निशांत फुलेकर यांनी दिली. हा ट्रक पार्सल घेऊन जात होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *