पुन्हा शिक्षक सर्वेक्षणाच्या दावणीला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्र राज्य मागास आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने सर्वेक्षण करण्याचे आदेश जारी केले आहेत, या अनुषंगाने आजपासून जिल्ह्यात सर्वेक्षणाला सुरुवात झाली. सर्वेक्षणाच्या कामात जिल्ह्यातील शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक कार्य प्रभावित झाले असून अनेक शाळा शिक्षकांअभावी ओस पडल्याचे चित्र होते. एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शासनाचा भर असल्याचे गवगावा केला जातो तर दुसरीकडे याच शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामातगुंतविले जात असल्याची टीका होत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सुरू केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २३ ते ३१ जानेवारी दरम्यान सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे.

यासाठी प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. २० प्रगणकांवर एका पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रगणक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील. प्रगणकांना सर्वेक्षणादरम्यान १२५ ते १५० प्रश्नांची माहिती भरावयाची आहे. ३१ जानेवारीनंतर संकलित माहिती मागासवर्ग आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे. शिक्षक व विविध शिक्षक संघटना शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये अशी मागणी करीता असताना देखील दरवेळी शिक्षकांना या ना त्या कामात गुंतविले जाते. जिल्ह्यात शिक्षकांची शेकडो पदे रिक्त असताना सर्वेक्षणासाठी ८० टक्के शिक्षकांना कामावर लावण्यात आले आहे. अनेक शाळा एक शिक्षकी आहेत. त्यामुळे या शाळेतील अध्यापनाचे कामे प्रभावित झाली आहेत. आज अनेक शाळा ओस पडल्याचे चित्र होते.

यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी गजभिये यांना विचारले असता सुट्टीवर असल्याचे सांगितले. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी शेख यांनी मीटिंगमध्ये असल्याचे सांगितले तर जिल्हाधिकारी यांनी प्रतिसाद दिला नाही. वेळोवेळी शिक्षकांवर अशैक्षणिक कामे थोपविली जातात. शिक्षकांना अध्यापनाची कामे करू द्या, अशी मागणी असताना देखील सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन सुरू आहे. येत्या दिवसांत वार्षिक परीक्षा देखील येतील, अभ्यासक्रमही पूर्ण करायचा असल्याने पुन्हा शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम दिल्याने अध्यापनाचे कार्य प्रभावित झाले असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *