भाविकांची गैरसोय होणार नाही असे नियोजन करा- जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील ‘कचारगड’ हे आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असून या ठिकाणी भाविक दरवर्षी मोठ्या श्रध्देने लाखोंच्या संख्येत यात्रेत सहभागी होत असतात. त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टीने यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून जबाबदारीने कामे करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी संबंधित विभागाला दिले. पारी कुपार लिंगो माँ कंकाली देवस्थान कचारगड येथील सभागृहात आायोजित यात्रेसंदर्भात पुर्वतयारीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी श्री. नायर बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगनथम, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय अधिकारी देवरी सत्यम गांधी, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, कचारगड देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे व माजी आमदार संजय पुराम मंचावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, कचारगड यात्रेचे आयोजन २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान (५ दिवस) करण्यात आलेले आहे. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा. कार्यकारी अभियंता पीडब्ल्युडी क्र.१ व २ तसेच जि.प. कार्यकारी अभियंता यांनी रस्त्यांची खड्डे बुजविण्याचे काम त्वरित करावे.
शाखा अभियंता जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन क्लोरिनेशन करावे. ग्रामसेवकाने विद्युत विभागामार्फत पथदिवे लावण्याचे काम दोन दिवसात पूर्ण करावे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने पुरेशा औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवावा, तसेच आरोग्य पथके स्थापित करण्यात यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न निरीक्षकाने दुकानातील खाद्य पदार्थांची नियमित तपासणी करावी. कार्यकारी अभियंता सा.बां. विभागाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटींग त्वरित लावावे. एस.टी. महामंडळाच्या आगार प्रमुखाने पुरेशा बसेसची व्यवस्था करावी. नगरपंचायत मुख्याधिकारी सालेकसा यांनी अग्नीशमनीची व्यवस्था करावी. नगरपंचायत मार्फत साफ-सफाई करण्याकडे विशेष लक्ष्य दयावे.
यात्रे दरम्यान योग्य ठिकाणी १२ सिसिटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जवळपास ५०० ते ६०० वाहने ठेवण्याची पार्कींग व्यवस्था करण्यात आलेली आहे. व्हीव्हीआयपी मान्यवर आले तर त्यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे, त्यामुळे सदर यात्रा चांगल्या पध्दतीने पार पडेल याची खबरदारी घ्यावी असे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे म्हणाले, गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा हा कार्यक्रम सुव्यवस्थीत पार पाडण्यात यावा. यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली जावी. सर्वप्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्यात यावे. सदर ठिकाणी कोणताही पक्षपात करु नये. सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या समन्वयातून आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. सर्वांनी शिस्तबध्द पध्दतीने सदर यात्रेचा कार्यक्रम पार पाडावा असे त्यांनी सांगितले

. प्रास्ताविक कचारगड देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी केले. सालेकसा तालुका मुख्यालयापासून ६ कि.मी. अंतरावर हाजरा फॉल निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून जवळच आदिवासी कुलदैवतेचे श्रध्दास्थान म्हणून कचारगड देवस्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी फेब्रुवारी माघ पोर्णिमेनिमित्त पाच दिवसाच्या यात्रेचे आयोजन करण्यात येते व आदिवासी महासंमेलना निमीत्त या यात्रेस मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, महाराष्ट्र व इतर राज्यातून भाविक येथे मोठ्या श्रध्देने लाखोंच्या संख्येत येत असतात, असे त्यांनी सांगितले. सभेला जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, प्रभारी तहसिलदार अभिलाष जगताप, गटविकास अधिकारी दिलीप खोटेले, कोसमतर्रा गावच्या सरपंच सिंधू घरल व विविध विभागाचे कार्यालय प्रमुख यावेळी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *