राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता फिरता दवाखाना!

मुंबई : ग्रामीण व दुर्गम भागात थेट रुग्णांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहचावी या दृष्टीकोनातून आरोग्य विभागाने आता प्रत्येक जिल्ह्यात फिरता दवाखाना (मोबाईल मेडिकल क्लिनिकल व्हॅन) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हास्तरावर यासाठी एक कोटी रुपयांची सुसज्ज रुग्णवाहिका घेण्यात येणार आहे. करोनानंतर आरोग्य विभागाने आरोग्य सेवांचा सर्वार्थाने विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक जिल्ह्यात डे डेकअर केमोथेरपी केंद्र स्थापनेपासून अनेक ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येत आहे. ग्रामीण व दुर्गम भागात अनेक ठिकाणी आजही आरोग्यसेवा परिणामकारकपणे पोहोचत नसल्याचे आरोग्य विभागाला आढळून आले आहे. आजघडीला राज्यात १९०८ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून यातील तीनशेहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्र धोकादायक स्थितीत आहेत तर जवळपास ऐशी टक्के प्रथमिक आरोग्य केंद्रात पावसाळ्यात गळती होत असते. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नुतनीकरण करण्याबाबतही आरोग्य विभागाकडून योजना तयार करण्यात येत आहे. अनेक दुर्गम भागातील रुग्ण प्रथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांपर्यंतही पोहोचू शकत नसल्यामुळे अशा दुर्गम भागातील पाडे, वस्ती वा तांड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक याप्रमाणे फिरता दवाखाना सुरु करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे.

या फिरत्या दवाखान्यात म्हणजे सुसज्ज रुग्णतपासणी वाहानात रुग्णतपासणी, आरोग्य विषयक प्राथमिक चाचण्या तसेच समुपदेशाची व्यवस्था असणार आहे. एकूण ३५ रुग्णतपासणी वाहाने घेण्यात येणार असून यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. प्रामुख्याने पावसाळ्यात राज्यातील अनेक गावांशी संपर्क तुटतो. अशावेळी रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तसेच ग्रामीण रुग्णालयांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. तसेच पाडे व वस्त्यांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचल्यास रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य होईल हा यामागचा दृष्टीकोन असल्याचे आरोग्य आयुक्त धीरजकुमार यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेणाºयांच्या संख्या मागील तीन वर्षात कमी झालेली दिसते तसेच उपकेंद्रांमधील रुग्णोपचाराची संख्याही मोठी असल्याचे आरोग्यविभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार १९०८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २०१९-२० मध्ये तीन कोटी ६९ लाख ८२ हजार २९१ रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतले. २०२०-२१ मध्ये एक कोटी ८४ लाख ६५ हजार ४९२ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार झाले असून २०२१-२२ मध्ये ही संख्या आणखी कमी होऊन एक कोटी ८० लाख ६१ हजार २८३ रुग्णांवर उपचार झाले होते. दुर्गम भागात गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणी करण्यापासून ते सुरक्षित बाळंतपणाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *