मनोज जरांगेना धक्का…एसआयटीमार्फत चौकशी!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत सखोल चौकशी करावी, असे निर्देश अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले. संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचे समर्थन कुणीही करीत नाही. यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी करावी, असे अध्यक्ष अ‍ॅड.नार्वेकर यांनी सांगितले. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाजाने यापूर्वी काढलेले मोर्चे शांततेने झाले, तथापि यावेळी तसे घडले नाही. कोणी वैयक्तिक टीका करणार असेल तर सभागृहाने भूमिका घेतली पाहिजे. केवळ जरांगे यांची भूमिका नाही तर त्यांचा बोलविता धनी शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व चौकशी करून सत्य बाहेर काढले जाईल, असेही त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसºया दिवशी सभागृहाचे कामाकज सुरू होताच, भाजपाचे आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी माहितीच्या मुद्याद्वारे सदर विषय उपस्थित केला. ते म्हणाले, महाराष्ट्र बेचिराख करण्याचे कोणी ठरवले, या षडयंत्राची योजना पहिलेच ठरली होती काय, ही धमकी आहे काय, असे धमकी देण्यामागची भूमिका काय, हे कोणाचे कटकारस्थान आहे, या सर्व गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे. या हिंसाचाराचा बोलवता धनी कोण आहे, आंदोलन कुणी पेटवले, जरांगेंचा कोणत्या नेत्याशी संबंध आहे, कुठल्या नेत्यासोबत यांचा फोटो आहे, या सर्व गोष्टीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड. शेलारांनी केली. त्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा आदेश दिला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *