धान खरेदी केंद्रातील घटीची टक्केवारी पूर्वरत करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : जिल्ह्यात मागील वर्षी नोव्हेंबर २०२३ पासून शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धानाची खरेदी करण्यात आली. धान केंद्रात शेतकºयांच्या खरेदी केलेल्या धानाची उचल होण्यासाठी पाहिजे तशी गती अद्यापही प्राप्त झाली नाही तसेच जिल्ह्यातील शासकीय गोदामात भरडाई करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रात घट येण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील धान केंद्रचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सद्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली असून तापमानात वाढ होत आहे. तेव्हा शासकीय धोरणाचा आधार घेत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तत्परतेने डीओची व्यवस्थामध्ये गती वाढवून जिल्ह्यातील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांतील धान उचलण्यासाठी योग्य त्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. यासंदर्भात भंडारा जिल्ह्यातील खरेदी केंद्र चालकांचा प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्याचे सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात यावे अशी मागणी खासदार सुनिल मेंढे यांना निवेदनातून केली.

शासन स्तरावरून ०.५० टक्क्याची तूट १ टक्का करण्यासाठी १ नोव्हेंबर २०२३ रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधी व केंद्र चालकांचे प्रतिनिधी यांची बैठक मुंबई येथील सह्याद्रीमध्ये घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे कमिशन २० वरून ३१.२५ रुपये करण्याचे, प्रलंबित गोदाम भाडे देणे, शेतकºयांचे चुकारे वेळोवेळी देने यासह विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली होती. परंतु त्याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने तत्परतेने आधारभूत खरेदी केंद्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करावे अशी मागणी केली. सार्वत्रिक लोकसभा निवडणुक लागण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला आधारभूत धान खरेदी केंद्रातील समस्यांची जाणीव करून देण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र चालकांचे समस्या सोडवण्यासाठी खासदार म्हणून पुढाकार घ्यावा अशी मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम यांनी भंडारा व गोंदिया जिल्हा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी आधारभूत खरेदी केंद्र संघटनेचे शुभम बोरकर, सौरभ बावणे, सुरेश भोयर, संतोष लांजेवार, शुभम निमकर, जय निलकंठ मोरे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *